-
प्रतिनिधी
Lawrence Bishnoi Gang दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण असतानाच विले पार्ले येथील ज्वेलर्स अजित जैन (४६) यांना ‘लॉरेन्स बिश्नोई गँग, कॅनडा’च्या नावाने २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास जैन आणि त्यांच्या कुटुंबाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी सापळा रचत जामतारा सायबर टोळीतील चौघांना अटक केली आहे. दीपक नरेंद्र डांगोल (१९), वारंजे, पुणे – स्वयंपाकी, माजिद साजिद खान (२१), चित्ता कॅम्प, गोवंडी – भंगार विक्रेता, फैजान फिरोज खान (२७), कारेगाव, पुणे – एसी मेकॅनिक, साहिल इलियास शेख (२०), चित्ता कॅम्प, गोवंडी – कापड दुकानातील कामगार असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Lawrence Bishnoi Gang)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारीपासून जैन यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धमकीचे व्हॉट्सअॅप मेसेज येऊ लागले. २० लाख रुपयांची मागणी करत जीवघेणी धमकी देण्यात आली होती. पुढील काही दिवसांत जैन यांनी रक्कम ५ लाखांवर आणण्यासाठी वाटाघाटी केल्या. घाबरलेल्या जैन यांनी १६ फेब्रुवारी रोजी विले पार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून खंडणीखोरांच्या सूचनेनुसार जैन यांचे कर्मचारी कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात ५ लाखांची रोकड बॅगेत घेऊन गेले. टप्प्याटप्प्याने चार संशयित आले आणि बॅग उचलून ऑटोरिक्षातून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीपासून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. (Lawrence Bishnoi Gang)
(हेही वाचा – NCP National President : रोहित पवारांनी केला मोठा दावा; ३५ आमदारांच्या सह्या, मग ‘बाकी’ आमदारांचे मौन कोणासाठी?)
अटक केलेल्यांकडून ५ लाखांची रोकड आणि अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (५) (खंडणी) व ६२ (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. अटक आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी कोणताही संबंध नसून ते जामतारा येथून कार्यरत सायबर फसवणूक रॅकेटचा भाग असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी दूरस्थ ‘हँडलर्स’च्या सूचनेवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. धनबादचा बशीर नावाचा संशयित सायबर ऑपरेटर आणि जामताराशी संबंधित व्यक्तींचा तपास सुरू आहे. (Lawrence Bishnoi Gang)
अलिकडच्या काळात लॉरेन्स बिश्नोई आणि शुभम लोणकर यांची नावे विविध हाय-प्रोफाइल प्रकरणांत समोर आल्याने गुन्हेगार त्याच भीतीचा फायदा घेत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासकर्त्यांना संशय आहे की, मुंबईतील इतर नामांकित व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे धमक्या दिल्या गेल्या असाव्यात. एका वॉन्टेड आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, जामतारा एसपी राजकुमार मेहता यांनी मुंबई पोलिसांकडून अद्याप औपचारिक मदतीची विनंती मिळालेली नसल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गबाजी चिमटे यांनी “आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे स्पष्ट केले. (Lawrence Bishnoi Gang)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

