-
कल्याण, प्रतिनिधी
KDMC कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील करदात्या नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराची देयके यापूर्वीच बजावण्यात आली आहेत. यातील करचुकव्या कल्याण-डोंबिवलीकरांना इशारा देण्यात आला आहे. मालमत्ता/पाणीपट्टीची अभय योजना विचाराधीन नसल्याने करदात्यांनी आपापली देयके विहित वेळेत भरणा करावीत, असेही आवाहन कर निर्धारक व संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. (KDMC)
मालमत्ता कर भरण्याबाबत यापूर्वी वारंवार आवाहन केले आहे. मालमत्ता कराच्या रक्कमा विहित मुदतीत महापालिकेत जमा करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड चे प्रकरण आठ कर विषयक नियमातील नियम क्र. ४१ नुसार प्रतिमहा २ टक्के विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. महानगरपालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर कारवाई सुरुवात केली आहे. स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यासह कोणतीही पूर्वसूचना न देता नळ जोडणी खंडीत करण्यात येत आहे. (KDMC)
(हेही वाचा – दिल्ली पोलिसांची मोठी झडप! लॉरेन्सचा उजवा हात ‘Bobby Kabutar’ गजाआड; मूसेवाला हत्येचा हिशोब चुकता होणार?)
तसेच जप्त केलेल्या मालमत्तांचा जाहीर लिलावाने विक्री करण्याचा निर्णय प्रक्रियेत आहे. महानगरपालिकेमार्फत सन २०२३-२०२४ व सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात अभय योजना राबविण्यात आली होती. त्याप्रमाणे यावर्षी देखिल महानगरपालिकेकडून अभय योजना राबविली जाईल, असा अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र सद्या तशी कोणतीही योजना राबविण्याचा विचार नाही. (KDMC)
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांनी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता कर व पाणीपट्टीची अभय योजना लागू करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन नाही. त्यामुळे करदात्यांनी आपला संपूर्ण मालमता कर आणि पाणीपट्टी आजच भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे व दंडात्मक व कायदेशीर कारवाई टाळावी, असेही आवाहन कर निर्धारक व संकलन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले. (KDMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

