-
कल्याण, प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात. केडीएमसीच्या नियंत्रणाखालील शास्त्रीनगर, रूक्मिणीबाई रूग्णालय आणि इतर ३५ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रुग्णसेवेचा कारभार सक्षमपणे चालावा. या सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या सेवेतील कर्तव्यकठोर वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात नियुक्त करण्याकडे सामाजिक कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ई. रविंद्रन यांचे लक्ष वेधले आहे. (KDMC)
गेल्या वर्षभरात केडीएमसीचा आरोग्य विभाग वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेत राहिला आहे. केडीएमसीच्या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रूग्णांना किरकोळ आजारावरील उपचारांसाठी थेट मुंबई-ठाण्याकडील रूग्णालयांत पाठविले जाते. रूग्ण पाठविताना त्यांना वेळेत केडीएमसीची रूग्णवाहिका उपलब्ध न होणे, गरोदर महिलेला रूग्णालयात दाखल करून घेण्यात दिरंगाई झाल्याने रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातच तिची प्रसूती होणे, रूग्णालयाच्या कारभारात समन्वय नसणे, सर्प दंश झालेल्यांचा उपचारांअभावी मृत्यू होणे, असा अनागोंदी कारभार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूग्णालयांचा उघड झाला आहे. (KDMC)
आरोग्य विभागांतर्गत असलेल्या श्वान निर्बिजीकरण केंद्रातील आर्थिक गैरव्यवहार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामात अनियमितता, महापालिका सेवेत असतानाही आपल्या मालकीचा गाळा नियमबाह्यपणे पुन्हा पालिकेला भाड्याने देऊन ऑफिस ऑफ प्रॉफिट कायद्याचा भंग करणे, आदी अनेक प्रकार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केले आहे. या सगळ्या गैरप्रकारांत आरोग्य विभागातील श्वान निर्बिजीकरण केंद्रात एक कर्मचारी गेल्या वर्षी आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबित केला आहे. एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे. तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याची सेवा खंडित केली आहे. रात्रीच्या वेळेत शस्त्रक्रियागृहांचा वापर काही डॉक्टरांनी नियमबाह्यपणे केल्याचे प्रकार घडले आहेत. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रपाळीमध्ये कर्तव्य असताना ते कर्तव्यावर हजर झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून उघडकीस आले असल्याचे मनोज कुलकर्णी यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. (KDMC)
(हेही वाचा – Union Budget 2026 : आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प! कोणत्या क्षेत्राला किती निधीची तरतूद?, जाणून घ्या)
त्या अधिकाऱ्यांची आजही आठवण…
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी खमक्या आणि कठोर शिस्तीचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी नसल्याने वैद्यकीय आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले आहेत. त्यामुळे शासन सेवेतील अनुभवी वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नियुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ई. रविंद्रन यांच्याकडे केली आहे. सचिव रविंद्रन हे यापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत दोन वर्ष आयुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी शासन सेवेतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी शिस्तीने कारभार चालविला होता. त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या काळात आरोग्य विभाग सक्षमपणे चालेल, याची काळजी घेतली होती. (KDMC)
कर्तबगार अधिकाऱ्यांची पाठ फिरताच…
तत्कालीन आयुक्त यू. पी. एस. मदन यांनी सेंट्रल रेल्वेतून निवृत्त झालेल्या डॉ. चटर्जी उर्फ बाबूजी यांना केडीएमसीत सामावून घेतले होते. डॉ. संजीव कांबळे हे शासन सेवेतील, तसेच महापालिका सेवेतील डॉ. स्मिता रोडे यांनी वैद्यकीय आरोग्य विभाग सक्षमपणे चालवून नागरिकांना दर्जेदार, तसेच उत्तम आरोग्य सेवा मिळेल यादृष्टीने प्रयत्न केले होते. या अधिकाऱ्यांची केडीएमसीतून पाठ फिरताच वैद्यकीय आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. त्याला नवसंजीवनी मिळावी यासाठी शासनाच्या सेवेतील कर्तव्यकठोर वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात नियुक्त, करावेत, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले आहे. यावर राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ई. रविंद्रन काय निर्णय घेतात, याकडे त्रस्त रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नजरा लागल्या आहेत. (KDMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

