Mobile : चोरांच्या नेटवर्कवर पोलिसांचा जॅमर

49
Mobile : चोरांच्या नेटवर्कवर पोलिसांचा जॅमर
Mobile : चोरांच्या नेटवर्कवर पोलिसांचा जॅमर
  • संतोष वाघ

मुंबई पोलिसांनी नुकतीच आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय मोबाईल (Mobile) चोरीचे जाळे उघड केले आहे. उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) देशाच्या बाहेर चोरीचे मोबाईल पाठवून परदेशात त्या मोबाईलची विक्री होत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी मुंबईतून वर्षभरात चोरीला गेलेल्या हजारो मोबाईल फोनपैकी चोरलेले तब्बल १,६५० मोबाईल फोन उत्तर प्रदेशातून परत आणून हजारो नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज शेकडो नागरिक मोबाईल (Mobile) चोरीचा बळी ठरत आहेत. लोकल ट्रेन, गर्दीची ठिकाणे, बसस्थानके, धार्मिक स्थळे किंवा मॉलमध्ये क्षणात घडणाऱ्या या चोरीनंतर मोबाईल पुन्हा मिळेल, अशी अपेक्षाच बहुतांश लोक सोडून देतात. मात्र अलीकडील एका मोठ्या कारवाईत मुंबई पोलिसांनी या चोरीमागे असलेले आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय जाळे उघड करत चोरलेले तब्बल १,६५० मोबाईल फोन उत्तर प्रदेशातून परत आणले असून, हजारो नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे.

तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, मुंबईत चोरी झालेला मोबाईल (Mobile) फोन अवघ्या २४ ते ४८ तासांत शहराची सीमा ओलांडून उत्तर प्रदेशात पोहोचत होता. त्यानंतर काही मोबाईल स्थानिक बाजारात विकले जात, तर मोठ्या प्रमाणावर मोबाईल नेपाळ सीमामार्गे परदेशात पाठवले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नेटवर्कमुळे मोबाईल ट्रेस करणे अत्यंत कठीण होत होते.

(हेही वाचा – Republic Day 2026 : मदर ऑफ ऑल डील्स! प्रमुख पाहुणे असलेले युरोपियन युनियनचे नेते भारतात दाखल)

पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेन भारती (Deven Bharti) यांनी १८ जून २०२५ या दिवशी मुंबई सायबर सेलला चोरीचे मोबाईलचा शोध घेण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून घोषित केले. त्यानंतर मुंबईतील १३ परिमंडळांमध्ये १३ विशेष पथकांची स्थापना करून केवळ मोबाईल चोरी प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तपासात असे आढळले की, मुंबईत एकूण सुमारे ७० हजार मोबाईल चोरी किंवा हरविल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

या सर्व तक्रारींमधील मोबाईलचे आयएमईआय नंबर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलवर अपलोड केल्यानंतर मोठा खुलासा झाला. तब्बल १६ हजार मोबाईल फोन उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले. त्यानंतर १३ परिमंडळातील १३ स्वतंत्र पथके उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आली. मोठ्या शोधमोहिमेनंतर ३ जानेवारी २०२५ पर्यंत १,६५० मोबाईल फोन मुंबईत परत आणण्यात यश आले आहे. काही पथके अजूनही उर्वरित मोबाईलचा शोध घेत आहेत.

पीलीभीत, लखीमपूर खिरी, बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर, मेरठ, बिजनौर, गोरखपूर आणि महाराजगंज हे नेपाळ सीमेला लागून असलेले जिल्हे या कारवाईत विशेषतः समोर आले आहेत. तपासात असे आढळले की चोरी करणारे टोळके मुंबईतील लोकल ट्रेन, गर्दीचे प्लॅटफॉर्म, धार्मिक स्थळे, मॉल आणि बसस्थानकांना लक्ष्य करत होते. गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरण्यात येत असे आणि काही मिनिटांतच सिम कार्ड काढून फोन स्विच ऑफ केला जात असे.

(हेही वाचा – Dombivli fire : डोंबिवलीत भीषण आगीत घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही)

यानंतर हे मोबाईल कुरिअर कंपन्या, खासगी बस किंवा रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात पाठवले जात. प्रत्येक वेळी वेगवेगळे मार्ग वापरले जात असल्याने पोलिसांना कोणताही ठराविक पॅटर्न समजत नव्हता. उत्तर प्रदेशातील काही मोबाईल दुकानदार या संपूर्ण रॅकेटचा महत्त्वाचा भाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे दुकानदार कोणतेही बिल किंवा कागदपत्रांशिवाय अत्यंत कमी किमतीत मोबाईल (Mobile) खरेदी करत आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने आयएमईआय नंबर बदलून पुन्हा बाजारात विक्री करत होते. अनेकांना मोबाईल चोरीचे असल्याची पूर्ण कल्पना असूनही ते आर्थिक फायद्यासाठी या जाळ्यात सहभागी होते.

पोलिसांनी काही मोबाईलची ट्रॅकिंग केल्यानंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली. मोठ्या प्रमाणावर मोबाईल नेपाळ सीमामार्गे इतर देशांमध्ये पाठवले जात होते. नेपाळमध्ये हे मोबाईल घाऊक दरात विकले जात आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत अनेक पटींनी वाढत होती. मात्र नेमके कोणत्या देशांमध्ये हे मोबाईल जात होते, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत मुंबईत ३९,२५७ मोबाईल चोरी किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. आयएमईआय आणि सीईआयआर तंत्रज्ञानाच्या मदतीने याच कालावधीत २९ हजारांहून अधिक मोबाईल फोन परत मिळवण्यात आले. जून २०२५ पूर्वी केवळ ७ हजार (७ टक्के) मोबाईल सापडत होते, मात्र जूननंतरच्या सहा महिन्यांत देशभरातून २९ हजार मोबाईल (२६ टक्के) शोधून काढण्यात आले असून त्यापैकी २०,०८५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बालकवडे यांनी सांगितले की, “ पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते नागरिकांना परत देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यूपीमधील नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर मोबाईल सापडले असून उर्वरित मोबाईल आणि या रॅकेटमागील मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.”

या कारवाईमुळे मोबाईल चोरी झालेल्या हजारो नागरिकांना पुन्हा एकदा आशेचा किरण मिळाला असून, मुंबई पोलिसांची (Mumbai Police) ही मोहीम मोबाईल चोरीविरोधातील लढ्यात मैलाचा दगड ठरत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.