- मंजिरी मराठे
स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्यावर घेऊन जाणारं ‘महाराजा’ जहाज अंदमानच्या किनाऱ्याला लागलं. जहाजातून उतरल्यावर अंदमानचं निसर्ग सौंदर्य पाहून सावरकर हरखून गेले. समुद्र तटावरच्या नारळाच्या झाडाच्या डुलणाऱ्या पंक्ती, दूरवर आंब्यांच्या, सुपाऱ्यांच्या, पिंपळाच्या वृक्षांचे पुंज दिसत होते. अतिशय भयावह भविष्यकाळ समोर असताना त्यांना समोर दिसली, टेकडीवरची देखणी इमारत. तो कोणा सुखवस्तूचा बंगला नव्हता तर तेच होते बारीबाबाचे ‘सिल्व्हर जेल’ किंवा ‘सेल्युलर कारागृह’. एकदा त्याच्या आत शिरल्यावर बाहेरचं जग त्यांच्यासाठी लुप्त होऊन जाणार होतं. उमेदीची सारी वर्ष त्या कारागृहातच सरणार होती. पण त्याही परिस्थितीत त्यांच्या मनात विचार आला तो आपल्या देशाचा.
अंदमान निकोबार बेटं (Andaman and Nicobar Islands) ही हिंदुस्थानची पूर्वेकडची द्वारं. त्यामुळे याच ठिकाणी जागता पहारा ठेवला तर शत्रूला दारातच अडवता येईल असं त्यांना वाटलं आणि त्यांच्या मन:पटलावर दिसू लागल्या अंदमानच्या समुद्रात उभ्या असलेल्या स्वतंत्र हिंदुस्थानच्या शस्त्रसज्ज युद्धनौका. या कल्पनाविश्वात ते रमलेले असतानाच ‘उठाव बिस्तरा’ म्हणत एका शिपायानं त्यांना हटकलं आणि पुन्हा बाहेर न येण्यासाठीच त्यांचा सेल्युलर कारागृहात प्रवेश झाला.
आत शिरल्यावर दोन्ही फाटकांच्या मधला भाग सजला होता तो हातकड्या एकमेकांत गुंफून केलेल्या हिडीस फुलांनी. मोठमोठ्या पायबेड्या, दंडबेड्या, बायोनेट, बंदूका भिंतीवर ओळीने टांगलेल्या होत्या. ते पाहूनच एखादा खचून गेला असता. पण सावरकर लिहितात, ‘ती भीषणता मजकडे टक लावून डोळा वटारून पाहत होती. मीही तिच्याकडे डोळे वटारून पाहत होतो, डोळ्यास डोळा भिडवून पहात होतो. मला एक अद्भुत समाधान वाटू लागले… त्या भयाण दृश्याच्या जबड्यात न चुरला जाता मी निष्कंप, निर्भीड उभा राहिलो… ‘मूर्ती दुजी ती’ या कवितेचे चरण म्हणू लागले.. आणि जय..! असे उद्गार माझ्या हृदयात उठू लागले.’
(हेही वाचा – T-20 World Cup 2026 : रिझवानला वगळलं तर बाबर आझमचं कमबॅक! विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर)
बारीच्या आदेशानुसार जमादार सावरकरांना घेऊन सात क्रमांकाच्या चाळीत बंद करण्यासाठी घेऊन निघाला. वाटेत एक हौद होता. जमादारानं त्यांना तिथे स्नान करायला सांगितलं. समुद्र प्रवासात आंघोळ तर शक्यच नव्हती. उलट स्वच्छतेशी संबंधच नसलेल्या पन्नास एक अतिशय गदळ सराईत क्रूरकर्म्यांबरोबर, ते सगळे जेमतेम मावतील अशा लोखंडी पिंजऱ्यातून त्यांचा प्रवास झाला होता. त्यामुळे स्नान करायला मिळणार या कल्पनेनंच त्यांना अतिशय आनंद झाला. पण आंघोळ करणार कशी? अशा विचारात ते असतानाच जमादार त्यांना म्हणाला, ‘ही घ्या लंगोटी! आता काम करताना आणि स्नानाचे वेळी नेहमी ही लंगोटी नेसली पाहिजे!’ क्षणभर त्यांना संकोच वाटला, पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी विचार केला, ‘हा रे वेड्या! अरे रामदास देखील लंगोटीच नेसत असत. ह्या तुझ्या कपड्यात काय आहे ते सर्वांना माहीत आहेच. मग तू ते कोणापासून लपवितोस?’ असा विचारांचा कल्लोळ डोक्यात माजलेला असतानाच त्यांनी जमादारानं सांगितल्याप्रमाणे बंदिवानाचे कपडे उतरवून लंगोटी नेसूनही टाकली. सर्वांसमोर प्रथमच लंगोटी नेसताना इतर राजकीय बंदीवानांची लाजेनं जी त्रेधातिरपीट उडे ती पाहण्याचा आनंद काही जमादाराला घेता आला नाही. त्यामुळे हा अगदी निगरगट्ट मनुष्य आहे, अशी त्याची समजूत झाली असणार. सावरकर आनंदाने कटोरा भरून पाणी घ्यावयास लागले. तेवढ्यात जमादार ओरडला, ‘‘असे नाही करावयाचे, हे काळेपाणी आहे. प्रथम उभे राहावयाचे. मग मी म्हणेन ‘लेव पाणी!’ म्हणजे लवावयाचे आणि पाणी घ्यावयाचे एक कटोरा. मग मी म्हणेन ‘अंग मला’ म्हणजे अंग घासायचे हाताने. आणि पुनः मी म्हटले ‘और लेव पाणी’ की पुनः दोन कटोरे पाणी घ्यावयाचे आणि परत फिरावयाचे. तीन कटोरा पाण्यात स्नान करावयाचे!”
ते ऐकून सावरकर (Swatantryaveer Savarkar) चरकले तरी त्यांनी स्वत:लाच समजावलं, ‘‘नाशिक -त्र्यंबकास संकल्पाच्या शिस्तीने स्नाने करण्याची सवय मला होतीच. मनात हसून म्हटले, तसाच हाही एक संकल्पच म्हणावा. तो गोऱ्या-पाण्यावरचा संकल्प असे. हा काळेपाण्यावरचा स्नानसंकल्प म्हणावा. मी स्नान करू लागलो. तो डोळे एकदम गच्च मिटून जाऊन काही दिसेनासे झाले आणि आग होऊ लागली. झाले तरी काय? संकल्पात कोठे चूक तर झाली नाही! इतक्यात कोठेशी चूळही भरली गेली! तो तोंड एकदम थू थू थू करून बंड करून उठले. जीभ अगदी खारट झाली. तेव्हा साहस करून जमादारास विचारले, ‘हे पाणी खारट कसे झाले?’ तो म्हणाला, ‘म्हणजे समुद्राचे पाणी कधी गोड असते की काय?’ तेव्हा ध्यानात आले की, आम्हाला हे समुद्रस्नान होत होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने अंदमानास स्नानास, कपडे धुण्यास, वापरण्यास सर्व समुद्राचे पाणी वापरावे लागते. तेही नळाने आणून कोंडीत साठविलेले. अंग सगळे चिगचिगीत झाले. केस राठ झाले. स्नान केले नसते तरी बरे असे वाटू लागले. पण पुनः वाटले, आता सवय झालीच पाहिजे. लंडन वा पॅरिससमधले ‘टर्किश बाथ’ उपभोगिलेत – आता थोडी ‘अंदमानीश बाथांची’ ही गंमत नको का अनुभवायाला! राष्ट्रीय पापांचे क्षालन खारट पाण्याच्या ‘लेव पाणी’ म्हणून ओरडणाऱ्या कठोर संकल्पाचे आज्ञेप्रमाणे घेतलेल्या ह्या तीन कटोरी स्नानानेच होणार आहे!”
सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली असताना, भविष्य पूर्णपणे अंधारात असताना असं मनोधैर्य राखणं, विनोदबुद्धी जागृत ठेवणं हे एखाद्या ‘वीरा’ला, वीर सावरकरांनाच साध्य होऊ शकतं.
(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

