Covid-19 नंतर मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्या; अहवालात धक्कादायक माहिती आली समोर

99
मुलांना डोळ्यांची तपासणी करताना डॉक्टर
Covid-19 नंतर मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्या; अहवालात धक्कादायक माहिती आली समोर

कोविड-१९ (Covid-19) या महामारीच्या काळानंतर जगभरामध्ये मुलांच्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. खासकरून मायोपिया म्हणजेच जवळची दृष्टी कमी होणं किंवा दूरचं अस्पष्ट दिसणं ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जगभरात झालेल्या अनेक रिसर्चमुळे हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे की, लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आणि मैदानी खेळण्याचा किंवा इतर ऍक्टिव्हिटी करण्याचा वेळ कमी झाला. त्याचा लहान मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम झाला.

भारतामध्ये DESK म्हणजेच डिजिटल आय स्ट्रेन अमंग किड्सच्या रिसर्चनुसार, कोविड-१९ (Covid-19) च्या अगोदरच्या काळात मुलांचा एका दिवसाचा स्क्रीन टाइम सरासरी १.९ तास होता. पण हाच वेळ कोविड-१९ च्या दरम्यान ३.९ तासांवर पोहोचला. त्यामुळे मायोपिया या आजाराचं प्रमाण वेगाने वाढलं. कोविड-१९ काळादरम्यान ४६ टक्के मुलांमध्ये वर्षाला १ डायॉप्टर किंवा त्यापेक्षाही जास्त मायोपियाचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण कोविड-१९ पूर्वी फक्त ११ टक्के होतं. दक्षिण भारतातल्या शाळांमधल्या मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण हे कोविडनंतर ३ ते ६ पट वाढलं. शाळकरी मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण दुप्पट झालं असून, सध्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं मायोपियाने ग्रस्त आहेत.

(हेही वाचा – Pak Kabaddi Player in Indian Jersey : ‘त्या’ पाक कबड्डीपटूवर अनिश्चित काळासाठी बंदी)

जागतिक पातळीवरसुद्धा मुलांची परिस्थिती चिंताजनक आहे. कोविड-१९ (Covid-19) काळानंतर चीनमध्ये ६ ते ८ वर्षांच्या मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण १.४ ते ३ पट वाढलं. तर हाँगकाँगमध्ये २०२१ साली ३६ टक्के मुलांना मायोपियाने ग्रासले होते. एवढंच नाही तर साल २०२० ते साल २०२३ दरम्यान जगभरातल्या मुलांमध्ये मायोपियाचं प्रमाण ३५.८ टक्के एवढं झालं असून, ते साल २०५० पर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मुलांना मायोपिया होण्याची मुख्य कारणं म्हणजे घरातच बसून राहणं, जास्त प्रमाणात असलेले ऑनलाइन क्लासेस, मोबाइल किंवा टॅबलेटचा अतिवापर आणि बाहेरच्या नैसर्गिक प्रकाशाचा अभाव होय. रिसर्चनुसार असं लक्षात आलं आहे की, दररोज १ तासापेक्षा कमी सूर्यप्रकाशात राहणं आणि ५ तासांपेक्षा जास्त स्क्रीन टाइम असणं या गोष्टींमुळे मायोपिया वेगाने वाढतो. याव्यतिरिक्त डिजिटल आय स्ट्रेनमुळे मुलांना डोळे कोरडे पडणं, डोकेदुखी आणि थकवाही जाणवतो.

मायोपियाचं हे वाढतं प्रमाण धक्कादायक आहे. कारण मायोपियामुळे फक्त चष्मा लागत नाही; तर हाय मायोपियामुळे रेटिना डिटॅचमेंट, ग्लुकोमा, कॅटरॅक्ट यांसारख्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात. यांमुळे कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. भारतातल्या शहरी भागांमध्ये २०५० सालापर्यंत ४८ टक्के मुलांना मायोपिक होण्याचा धोका आहे. मायोपियाला प्रतिबंध करण्यासाठी २०-२०-२० हा नियम पाळा. म्हणजेच दर २० मिनिटांनी २० सेकंद २० फूट दूर पाहायला हवं. दररोज कमीतकमी २ तास मैदानी खेळ खेळावेत. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवावा आणि नियमित डोळ्यांची तपासणी करायला हवी. पालकांनीही आपल्या मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. (Covid-19)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.