Cyber ​​Fraud : भारतामध्ये ४०० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ; ग्रामीण भागांवर कसा होत आहे परिणाम ?

172
Cyber Security : आता छोट्या रकमेच्या ऑनलाईन फसवणुकीसाठी मिळणार २५,००० रुपयांपर्यंतचं संरक्षण

गेल्या काही वर्षांपासून भारतात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पाहिलं तर असं लक्षात येतं की, साल २०२१ ते साल २०२४ दरम्यान सायबर गुन्ह्यांमध्ये ४०० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झालेली आहे. सायबर गुन्ह्यांची ही वाढ विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये दिसून येत आहे. त्याचं कारण असं की, तिथे इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर तर वेगाने वाढला आहे; पण तिथल्या लोकांमध्ये सायबर सुरक्षेच्या बाबतीत खूप कमी जागरूकता आहे. त्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी विभागांवर अशा सायबर फसवणुकींचा गंभीर परिणाम होत आहे. (Cyber ​​Fraud)

शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ या योजनेअंतर्गत देशातल्या बहुतांश ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये इंटरनेट सेवा वाढली आहे. पण त्या विभागातल्या लोकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयीची जागरूकता कमी प्रमाणात असल्यामुळे यूपीआय, ऑनलाइन बँकिंग आणि सरकारी योजनांसाठी डिजिटल व्हेरिफिकेशन अनिवार्य असूनही नवीन युजर्स फसवणुकीचे लक्ष्य बनत आहेत. सायबर गुन्ह्यांतर्गत असणाऱ्या फिशिंग, स्पूफ्ड कॉल्स, फेक इन्व्हेस्टमेंट स्कीम्स, ओटीपी फ्रॉड आणि डिजिटल अरेस्ट यांसारख्या फसवणुकींमुळे ग्रामीण विभागातल्या लोकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. (Cyber ​​Fraud)

(हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा अनोखा विक्रम, मिताली राजनंतर १०,००० धावा करणारी दुसरी भारतीय महिला)

देशातल्या ग्रामीण विभागांमध्ये असलेला सायबर जागरूकतेचा अभाव असल्यामुळे, साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि आर्थिक संकटं जसं की, शेतीचं नुकसान किंवा वैद्यकीय खर्च इत्यादी गोष्टींमुळे लोक सायबर फसवणुकीला बळी पडतात. ग्रामीण विभागांमध्ये एखादी लहान रक्कमही त्यांच्या आयुष्यभराची कमाई असते. त्यामुळे रक्कम लहान असली तरी ग्रामीण विभागातल्या लोकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं. बिहार, ओडिशा, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये ग्रामीण विभागांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सर्वांत जास्त वाढ झालेली आहे. २०२४ साली सायबर गुन्ह्यांमुळे देशभरात ₹२२,८४५ कोटी एवढं नुकसान झालं आहे. देशांतल्या ग्रामीण भागांमध्ये सायबर गुन्हे घडण्याचं प्रमाण जास्त दिसून येत आहे. देशांतल्या जामतारा आणि मेवात यांसारख्या ग्रामीण भागांतून येणारे फ्रॉड कॉल्स आणि स्कॅम हब्स वाढले आहेत. या सायबर फसवणुकीमुळे देशभरातल्या लोकांवर परिणाम होत आहे. (Cyber ​​Fraud)

सायबर गुन्ह्यांच्या या समस्येवर उपाय म्हणून भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच I4C ने १९३० हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. याव्यतिरिक्त सिटीजन फाइनेंशियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम आणि जागरूकता मोहीमाही सुरू केल्या आहेत. शासनाच्या या धोरणामुळे काही रक्कम वाचवली गेली आहे. पण तरीसुद्धा देशातल्या ग्रामीण विभागांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणं, स्थानिक भाषांमधून लोकांना सायबर फसवणुकीविषयी जागरूक करणं आणि पोलिसांची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे. सायबर गुन्ह्यांमुळे भारताच्या ग्रामीण विभागांमध्ये आर्थिक आणि सामाजिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वप्रकारच्या उपाययोजना तातडीने राबवणं गरजेचं आहे. (Cyber ​​Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.