
-
कल्याण, प्रतिनिधी
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत केबल उपसून त्या चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. मात्र या भागातील दोघा जागरूक रहिवाशांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दोन्ही वेळेस चोरीचा मनसुबा फसला गेला आहे. जमिनीत गाडलेल्या केबल उखडून त्या चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे यातून दिसून येत आहे. मात्र या साऱ्या प्रकारांपासून केबल्सची मालकी असलेली बीएसएनएल कंपनी अनभिज्ञ असल्यामुळे तक्रारदार कुणीही पुढे येत नाही, परिणामी पोलिसही हतबल झाले आहेत. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या गटारांसह नाले आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची बांधकामे ठेकेदारांच्या मार्फत जोरात सुरू आहेत. ही कामे करत असताना विविध सरकारी कंपन्यांच्या जुन्या-नव्या केबल त्यात दिसत आहेत. त्यातील काही केबल वापरात नसल्याचे दिसत आहे. त्यात बिएसएनएल कंपनीच्या टेलिफोन आणि नेटच्या केबल्सचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. अशा नजरेआड झालेल्या केबल्सवर चोरांची वक्रदृष्टी वाढली आहे. (Dombivli News)
(हेही वाचा – India–Russia relations: आता ४० ऐवजी २४ दिवसांत भारतीय वस्तू रशियात पोहोचणार)
रविवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास जेव्हा संपूर्ण डोंबिवलीचा वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा सर्वत्र पसरलेल्या काळोखाची संधी साधून केबलचोर निवासी विभागात दाखल झाले होते. मिलापनगरमधील बंगलो प्लॉट क्र. आर एल – १२८ च्या समोर गटार-केबल गाडण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरून काही जण त्यातील केबल कापून ती गोणपाटात भरून घेऊन जाताना स्थानिक जागरूक रहिवाशी फुलाजी गायकर यांना आढळून आले. संशय आला म्हणून हटकले असता आम्ही टेलिफोन कंपनीची माणसे असल्याचे सांगितले. आपण पकडले जाऊ शकतो, या भितीने कापून गुंडाळून ठेवलेले केबलचे तिन्ही बंडल तेथेच टाकून चोरट्यांनी पळ काढला. हा सारा प्रकार फुलाजी गायकर यांनी जागरूक रहिवासी राजू नलावडे यांना फोनद्वारे सांगितला. (Dombivli News)
राजू नलावडे यांनी तात्काळ बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना सदर केबलचे फोटो पाठवून कळविले. मात्र बीएसएनएलचे कर्मचारी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने घटनास्थळी येण्यास तयार नव्हते. मात्र मानपाडा पोलिसांना कळविले असता रविवारी रात्री पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. केबलची तिन्ही बंडले पोलिसांना दाखविण्यात आली. त्या तीन बंडलपैकी एक बंडल समोरील बंगल्याच्या कुंपणाच्या आत ठेवले. उरलेली दोन केबलची बंडले खोदलेल्या खड्ड्यात असल्याने ती काढता आली नाहीत. मात्र केबल चोरांनी दोन बंडले रात्री येऊन घेऊन गेले. सोमवारी दुपारी बीएसएनल कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कापलेल्या एका केबल बंडलची पाहणी केली असता त्या केबल बीएसएनल कंपनीच्याच असल्याची कबूली अधिकाऱ्यांनी दिली. याची तक्रार बीएसएनलकडून मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Dombivli News)
(हेही वाचा – Maharashtra Winter Session : विधिमंडळात ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर)
खबरदारी घेण्यात बीएसएनलची टाळाटाळ
यापूर्वी रविवारी २३ नोव्हेंबच्या रात्री निवासी भागातील प्लॉट क्रमांक आर एक्स ०१ साईसृष्टी सोसायटी समोरून अशीच केबल कापून नेली. तेव्हाही जागरूक रहिवासी राजेश कोलापाटे यांनी केबल चोरांना हटकले होते. एका केबल चोराचा फोटो कोलापाटे यांनी काढला होता. मात्र त्यावेळी चोरांनी केबलसह पलायन केले होते. त्यावेळी देखिल ही बाब बीएसएनएल अधिकाऱ्यांना कळविली होती. तेव्हाच जर का बीएसएनल कंपनीकडून खबरदारी घेतली असती किंवा पोलिसांत तक्रार दिली असती तर भविष्यात होणाऱ्या केबल्सच्या चोऱ्या टळल्या असत्या. (Dombivli News)
(हेही वाचा – Bharat Mandapam : दिल्लीत भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन)
केबल्स चोरांचा ठेकेदाराशी संबंध ?
एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये केबल चोरांची टोळी सक्रिय असून हे चोरटे रविवार किंवा सुट्टीच्या दिवसाची संधी साधून चोऱ्या करत असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या महिनाभरात बीएसएनएल कंपनीच्या केबल्स चोरीस जाण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. भंगारात अशा केबल्सला चांगला भाव मिळत असल्याने त्या विकल्या गेल्या असतील. बहुदा केबल चोर गटारे आणि केबलसाठी खड्डा खोदणाऱ्या ठेकेदाराशी संबंधित असावेत, असा संशय जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केला. (Dombivli News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
