-
ऋजुता लुकतुके
सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांवर भारतीयांचं असलेलं प्रेम लपून राहिलेलं नाही. पण, पण, आकड्यांमध्ये हे प्रेम मांडायचं झालं तर हा आकडा २५,००० टनांच्या वर जातो आणि हे आकडे समजून घ्यायचे झाले तर अमेरिका, जर्मनी, चीन यांच्या सरकारी तिजोरीत असलेल्या सोन्यापेक्षा हे प्रमाण कितीतरी जास्त आहे. इतकंच नाही तर खुद्द रिझर्व्ह बँकेचा साठाही घरातील सोन्यापुढे फिका आहे. विश्लेषक ए. के. माधवन यांनी सरकारी आकडेवारीचा दाखला देत ही आकडेवारी संकलित केली आहे आणि भारतीय घरांमध्ये असलेल्या साठ्याची तुलना जागतिक पातळीवर केली आहे. त्यांनी काढलेले काही निष्कर्ष विचार करायला लावणारे आहेत. मागच्या एका वर्षांत भारतीय घरांमध्ये असलेल्या सोन्यात किमतीच्या निकषावर ७५० अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली आहे. (Gold In Indian Houses)
(हेही वाचा – Asia Cup Drama : अंतिम सामन्यातील पराभवामुळे पाक मंडळ खेळाडूंवर कारवाई करणार ?)
विश्लेषक ए. के. माधवन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताचा खाजगी सोन्याचा साठा २५,००० टन आहे, जो अमेरिका, जर्मनी, चीन आणि अगदी रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन, स्वित्झर्लंड, भारत, जपान आणि तुर्की यासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे असलेल्या एकूण सोन्याच्या साठ्याची तुलना भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याशीही होत नाही. यावरून भारतातील लोक बचत किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याला किती महत्त्वाचे मानतात हे दिसून येते. (Gold In Indian Houses)
(हेही वाचा – Accident News : भरधाव बस थेट दुर्गा मंडपात घुसली; २० जणांना धडक, चालक मद्यधुंद अवस्थेत)
भारतात सणासुदीला मौल्यवान दागिने घालण्याची परंपरा आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांमध्ये नुकसान झाल्यास जोखीम कमी करण्यासाठीचा उपाय म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. सध्याची जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकेबरोबर आयात शुल्कावरून सुरू असलेली चढाओढ यामुळे भारतीयांनी सोन्यातील आपली गुंतवणूक वाढवलेली दिसत आहे. सोने नेहमीच आवडते राहिले आहे. कारण ते महागाई, आर्थिक अनिश्चितता आणि चलनातील चढउतारांपासून संरक्षण म्हणून काम करते. लग्न आणि सणांच्या काळात त्याची मागणी आणखी वाढते. ग्रामीण रहिवासी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा सोन्याचा वापर तारण म्हणून करतात. सोन्याच्या किमतींमध्ये जागतिक चढउतार असूनही, चीननंतर भारत सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. (Gold In Indian Houses)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

