अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ‘नोबेल शांतता पुरस्कार’ साठी नामांकित करणाऱ्या युक्रेनियन खासदाराने आपले नामांकन मागे घेतले आहे. युक्रेनच्या संसदीय परराष्ट्र समितीचे प्रमुख ओलेक्झांडर मेरेझको यांनी मंगळवारी न्यूजवीकला सांगितले की, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदी करण्याविषयीचा विश्वास त्यांनी गमावला आहे. अलिकडच्या आठवड्यात युक्रेनच्या राजधानीवर झालेल्या मोठ्या प्रमाणावरील हल्ल्यांवर ट्रम्प यांची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. त्यांनी तुष्टीकरणाचा मार्ग निवडला आहे. ट्रम्प (Donald Trump) यांनी रशिया-युक्रेन युद्ध केवळ २४ तासांत संपवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अलिकडच्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर विनाशकारी हल्ले सुरू ठेवले आहेत. इतकेच नाही तर युद्धबंदी करारावर पोहोचण्याचे प्रयत्नही थांबले आहेत, असेही ओलेक्झांडर मेरेझको म्हणाले.
पाकिस्तानचा सूरही बदलला आहे. एवढेच नाही तर इराणच्या ३ प्रमुख अणुकेंद्र फोर्डो, इस्फहान आणि नातानझवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानचा सूरही बदलला आहे. नोबेल शांतता पुरस्कारासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांच्या नामांकनावरून पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात आणि प्रमुख व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांनी सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी पाकिस्तान सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांना पाहता २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव सुचविण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी स्वाक्षरी केलेले शिफारस पत्र नोबेल समितीकडे पाठवण्यात आले आहे. तथापि, अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यांनंतर या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ही शिफारस ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी आता पाकिस्तानातूनच होऊ लागली आहे.
जमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय-एफ) चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी कामगारांना संबोधित करताना म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प (Donald Trump) यांचा शांततेचा दावा आता खोटा ठरला आहे. सरकारने नोबेल नामांकनाची शिफारस ताबडतोब मागे घ्यावी. त्यांनी आरोप केला की पाकिस्तानी नेतृत्व ट्रम्प यांच्या लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटी आणि रात्रीच्या जेवणाने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी हा निर्णय घेतला. पॅलेस्टाईन, सीरिया, लेबनॉन आणि आता इराणवर इस्रायल समर्थित हल्ल्यांना पाठिंबा देणारा नेता शांततेचे प्रतीक कसा असू शकतो?, असा सवाल फजल यांनी केला आहे.
एकूणच नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, जेव्हा ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी जगभरातील सुरु असलेली युद्धे आपण थांबवणार आहे, असे वक्तव्य करून स्वतःची ‘शांतीचा मसीहा’ अशी प्रतिमा तयार करण्यास सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे श्रेय ट्रम्प स्वतःहून घेत आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झाला नसून स्वतः पाकिस्तान भारताकडे विनवण्या करू लागल्याने भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला, असे म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प (Donald Trump) यांनी जेथे जेथे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले ते अपयशी ठरले आहे.
Join Our WhatsApp Community

