Loksabha Election : रामदास आठवले लोकसभा निवडणूक लढवणार?; शिर्डी मतदारसंघात चाचपणी

२००९ मध्ये रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभा लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला असला, तरी तब्बल ३४ टक्के मते त्यांच्या पारड्यात पडली होती.

132

केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी शिर्डी मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून, भाजपाकडे २ लोकसभा आणि १० विधानसभेच्या जागांची मागणी केली आहे.

२००९ मध्ये रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभा लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला असला, तरी तब्बल ३४ टक्के मते त्यांच्या पारड्यात पडली होती. त्यानंतर आघाडीशी फारकत घेत ते भाजपात दाखल झाले आणि सलग दोन टर्म राज्यसभेच्या खासदारकीसह केंद्रीय मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. २०२६ मध्ये त्यांची खासदारकीची टर्म संपुष्टात येणार आहे. मात्र, यावेळी राज्यसभेऐवजी प्रत्यक्ष लोकांमधून निवडून येत पक्षाला ताकद देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिर्डीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेत त्यांनी तसे संकेतही दिले आहेत.

(हेही वाचा Modi Government : मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण)

या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती कायम ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर भाजपाने रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात शिर्डीसह लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या दहा जागा सोडाव्यात, अशी मागणीही या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, ‘माझी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. पण, मला जर संधी मिळाली तर पुन्हा शिर्डीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

विखे-पाटलांचीही साथ मिळणार

आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला महसूलमंत्री तथा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित होते. आठवलेंनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर विखे-पाटलांनी मोठे विधान केले. आठवले जसे तुमचे नेते आहेत, तसे आमचेही नेते आहेत. ते जो आदेश देतील तो शिरसावंद्य मानून आम्ही काम करू, असे विखे-पाटील म्हणाले. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटीलांनी आठवलेंचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा मार्ग मोकळा करून दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.