Mumbai-Goa Highway : सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

कोकणच्या विकासाच्या नावाखाली कोकणचा विनाश

349
Mumbai-Goa Highway : सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?
Mumbai-Goa Highway : सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

एस. एम. देशमुख

मुंबई-गोवा एनएच ६६ हा महामार्ग बारा वर्षे रखडला आहे. नितीन गडकरी म्हणतात, ‘कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, या महामार्गावर पुस्तक लिहावं लागेल.’ देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘हा महामार्ग का रखडलाय सांगता येत नाही…’  म्हणून पत्रकारांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारला तर ते ही म्हणतात, ‘हे पाप आमचं नाही.’ खासदार सुनील तटकरे यांनी ‘रखडलेल्या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत’ असं सांगून हात झटकले आहेत. कोकणी जनतेला कळत नाही की, हा महामार्ग का आणि कोणामुळे रखडलाय आणि सारेच लोकप्रतिनिधी या महामार्गाबद्दल एवढे उदासिन का आहेत.

एका राजकारणी मित्रानं मला खरं कारण सांगितलं… मलाही पटलं ते… तो म्हणाला, या महामार्गाचं सारं बजेट संपलं आहे. आता इथं ‘हात मारण्यासाठी’ शिल्लक असं काही राहिलं नसल्यानं पुढारी चुप्पी साधून आहेत. म्हणून रस्ता कधी पूर्ण होईल ते कोणीच सांगत नाही. गडकरी, बांधकाम मंत्री म्हणतात, डिसेंबरपुर्वी होईल. उदय सामंत मात्र शपथेवर एक वर्षाचा वादा करतात. म्हणजे खरं काहीच नाही. रस्ता होत नसल्यानं सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. खड्डे नाहीतच ते, महामार्गावर स्विमिंग टँक झालेत… त्याचं कोणालाच काही वाटत नाही. पत्रकारांची आंदोलनं आणि रवींद्र चव्हाण यांचे पाहणी दौरे मात्र सुरू आहेत.

(हेही वाचा – IND Vs IRE : ऋतुराजचे अर्धशतक, रिंकू सिंहची आक्रमक खेळीने भारताची 185 धावांपर्यंत मजल)

सरकारने रस्त्याचं काम लवकर पूर्ण करायला हवं. पण ते न करता आता सरकारनं अलिबाग-सावंतवाडी रस्त्याचं खूळ काढलंय. सहा पदरी हा रस्ता कोकणाच्या पर्यावरणाची वाट लावणारा आहे. जेथून हा रस्ता जाणार आहे तो सारा निसर्गरम्य परिसर आहे. ग्रीन फिल्ड रोडमुळं किती झाडं तुटतील, किती डोंगर कापले जातील, किती नारळी पोफळीच्या बागा उध्वस्त होतील आणि किती खाड्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलावे लागतील याची मोजदाद नाही. जेथून हा महामार्ग निघणार आहे त्या शहाबाज पासून वडखळ हे अंतर १० किलो मिटर देखील नाही. म्हणजे मुंबई-गोवा महामार्गापासून केवळ १० किलो मिटर अंतरावर समांतर हा ग्रीन फिल्ड रोड होतोय. दुसरीकडे जेथून सागरी महामार्ग जातोय ते अंतर या संभाव्य ग्रीन फिल्ड महामार्गापासून जेमतेम २५ किलो मिटर आहे. म्हणजे ५० किलो मिटरच्या पट्ट्यात सहा पदरी तीन महामार्ग होणार असतील तर कोकण संपला म्हणून समजा.

एका बाजुला सह्याद्री अन् दुसऱ्या बाजुला अरबी समुद्र. मधला ५० किलो मिटर रूंदीचा पट्टा म्हणजे कोकण. आता येथून तिसरा महामार्ग होणार आहे. खरंच ग्रीन फिल्ड महामार्गाची गरज आहे ? त्यापेक्षा मुंबई – गोवा महामार्ग सहाच्या ऐवजी आठ पदरी करून कोकणचा विकास साधता नाही येणार का ? मात्र कोट्यवधी रूपयांचा हा ग्रीन फिल्ड रस्ता पुढाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी होत असल्याने ग्रीन फिल्डला स्थानिक जनता, शेतकरी पाठिंबा देणार नाहीत हे नक्की. एका बाजुला घाटावरून अनेक रस्ते कोकणात आणून सोडताना सह्याद्री उभा आडवा कापला जातोय, त्याचे दुष्परिणाम आपण भोगू लागलो आहोत. पण ते कोणी पहात नाही. कारण त्यासाठी डोकं ठिकाणावर असावं लागतं. आमच्या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही याचं दु:ख होतंय, संतापही येतोय. कोकणच्या विकासाच्या नावाखाली कोकणचा विनाश केला जातोय, ते पाहवत नाही.

एकीकडं किमान ६० वर्षांपासून रेवस – रेडी सागरी महामार्गाचं तुणतुणं वाजवलं जातंय. बँ. अ. र. अंतुले यांचं स्वप्न होतं ते. स्वत: अंतुले मुख्यमंत्री झाले तरी त्यांना हा सागरी महामार्ग पूर्ण करता आला नाही. त्यानंतरही या महामार्गाकडे कोणी लक्ष दिलं नाही. खरं म्हणजे सागरी महामार्ग गोव्याला मुंबईच्या जवळ आणणार आहे. समुद्राच्या काठावरून जाणाऱ्या या महामार्गामुळं गोव्याचे पर्यटक वाढतील. पण त्याचा कोकणाला फारसा लाभ होणार नाही. तरीही कोकणी पुढारी सागरी महामार्गासाठी आग्रही यासाठी आहेत की, त्यांनी हजारो एकर जमिनी या संभाव्य महामार्गाच्या काठावर घेऊन ठेवलेल्या आहेत. सामान्य कोकणी जनता मात्र सागरी महामार्गाबद्दल फारशी उत्साही नाही. किंबहुना उदासिन आहे.

ग्रीन फिल्ड महामार्गाची मागणी कोणी केली ?

अलिबाग – सावंतवाडी या ग्रीन फिल्ड महामार्गाची मागणी कोणी केली ?  कोणीही नाही. तरीही या महामार्गाची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. अलिबागच्या शहाबाज पासून हा रस्ता निघेल, तो सावंतवाडी, क्षेत्रपाल पर्यंत असेल. रोहा, तळा, माणगाव, म्हसळा मार्गे हा रस्ता रत्नागिरीत प्रवेश करेल. वरील तालुक्यातील कोणत्या गावातून हा रस्ता जाईल, किती जमिन संपादित करावी लागेल, त्यांचे क्षेत्रफळ आणि सर्व्हे नंबर कोणते याची माहिती अधिसूचनेत दिली गेलेली आहे. विशेष राज्य महामार्ग क्रमांक ६, ग्रीन फिल्ड महामार्ग असं या महामार्गाचं नामकरण करण्यात आलं आहे. कोणी मागणी केली होती या महामार्गाची ? खरंतर कोणीच नाही.

( लेखक मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.