मरोशी ते सहार दरम्यानच्या ९० वर्षांपूर्वीच्या दोन्ही तानसा जलवाहिनी काढून टाकणार…

213
मरोशी ते सहार दरम्यानच्या ९० वर्षांपूर्वीच्या दोन्ही तानसा जलवाहिनी काढून टाकणार...
मरोशी ते सहार दरम्यानच्या ९० वर्षांपूर्वीच्या दोन्ही तानसा जलवाहिनी काढून टाकणार...

-सचिन धानजी, मुंबई

मरोशी ते सहार गावापर्यंत जुन्या झालेल्या १४५० मि. मी व्यासाच्या दोन तानसा जलवाहिन्या काढून टाकून त्याठिकाणी २००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तब्बल विविध करांसह सुमारे १८८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

सन १९२६ मध्ये तानसा ते पवई दरम्यान ६४ कि.मी. अंतरात टाकण्यात आलेल्या १८०० मि.मी. व १४०० मि.मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्यांमधून तानसा धरणाचे पाणी मुंबई शहराला पुरविण्यात येत होते. त्यानंतर, या जलवाहिन्यांच्या पश्चिम बाजूस वैतरणा व अप्पर वैतरणा जलवाहिन्या टाकण्यात आल्या. सुमारे ९० वर्षापूर्वी टाकलेल्या ज्या जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे वारंवार फुटण्याच्या घटना घडत असल्याकारणाने, मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊन हजारो लीटर पाणी वाया जात होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने टप्प्या टप्याने त्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम तीन टप्प्यात हाती घेतले.

(हेही वाचा – पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय: महिला, पुरुषांसह तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था)

त्यातील पहिल्या टप्प्यात तानसा धरणाजवळ आघाई ते गुंदवली या ३६ कि.मी. लांबीच्या व ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम हे सन २००८ ते २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बाळकुम ते सॅडल टनेल या ८.४ कि.मी. लांबीच्या व ३००० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची कामे सप्टेंबर २०१८ ते २०२२ मध्ये मध्ये पूर्ण करण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात भांडुप ते मरोशी या ६.०० कि.मी. लांबीच्या व २४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम नोव्हेंबर २०१९ पासून हाती घेण्यात आले असून हे काम प्रगती पथावर आहे. तसेच पुढील टप्प्यातील अस्तित्वात असलेल्या आणि जुन्या झालेल्या दोन १४५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या काढून मरोशी ते सहार गावापर्यंत एक २००० मि.मी. व्यासाची एक जलवाहिनी टाकण्याचे हाती घेण्याचा निर्णय जल अभियंता खात्याच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाने घेतला आहे. यामध्ये मरोशी गेट ते सहार गावापर्यंत २००० मि.मी. व्यासाची व ३.१५ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या अंतर्गत जुन्या झालेल्या तानसा जलवाहिन्या काढून टाकून २००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकणे, या जलवाहिनीच्या अंतर्गत सिमेंट गिलावा करणे. बटरफ्लाय झडपांची उभारणीसह इतर संलग्नित कामे करण्यासाठी मागील मार्च २०२२ रोजी निविदा मागवण्यात आली.

या निविदेत कोया अँड कंपनी कन्स्ट्रक्शन लि- मे. इन्फ्राटेक कट्रक्सन कंपनी या जॉईंट व्हेंचर ही कंपनी पात्र ठरली. विशेष म्हणजे यासाठी मागवलेल्या निविदेत १३ कंपन्यांनी निविदा खरेदी केल्या, पण केवळ तीन कंपन्यांनी या निविदेत भाग घेतला. यात आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, ए आर डब्लू इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आदी नामांकित कंपन्यांनी निविदा खरेदी करूनही यात भाग घेतला नाही. यामध्ये पात्र ठरलेल्या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २५ टक्के अधिक दराने बोली लावत हे १३७.७५ कोटी रुपये आणि विविध करांसह १५७ कोटी रुपयांमध्ये हे काम मिळवले आहे. हे काम पावसाळा धरून ३० महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.