Rudraksh Patil : आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलच्या यशाची कहाणी…

103

महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली, त्यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरुवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करीत संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. रुद्रांक्ष पाटील (Rudraksh Patil) हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याने नेमबाजीचा वर्ल्ड कप जिंकला.

दहा मीटर एअर रायफल्स संघातील रुद्रांक्ष पाटील (Rudraksh Patil) याने 632.5 अशी गुणांची कमाई केली. मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शानदार कामगिरी केली. पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाटील हा अभिनव बिंद्रानंतर दुसरा भारतीय ठरला होता. गेल्यावर्षी ईजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट कपच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत याने सुवर्ण पदक जिंकत महाराष्ट्रासह भारताचे नाव मोठे केले होते. त्याशिवाय सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के केले होते.

(हेही वाचा Mantralay : मंत्रालयाच्या जाळीवर तरुणाने मारली उडी; कायमस्वरूपी शिक्षक भरतीसाठी केले आंदोलन)

रुद्रांक्षला कुटुंबाची साथ

देशात एकीकडे सर्वांना क्रिकेटने वेड लावले असताना रुद्रांक्षने वेगळ्या वाटेने जात रायफल शूटींगमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. दरम्यान या सर्वांमध्ये रुद्रांक्षच्या परिवाराने त्याला खूप पाठिंबा दिला. रुद्रांक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. आई हेमांगिनी पाटील या परिवहन विभागात नवी मुंबई वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. रुद्रांक्षला कुटुंबाने साथ दिल्यामुळेच त्याने यशाचे शिखर गाठले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील (Rudraksh Patil), दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.