-
ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक स्पर्धेला अगदी काही तास शिल्लक असताना ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला असून, अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वीच ही कटू बातमी संघाला पचवावी लागली आहे. त्याच्या जागी कोणाची निवड करायची याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. (T20 World Cup 2026)
हेजलवूडच्या माघारीनंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण याआधीच कर्णधार पॅट कमिन्स स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०२५ हे वर्ष हेजलवूडसाठी टी-२० क्रिकेटमध्ये अत्यंत यशस्वी ठरले होते. आयपीएल २०२५ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. याशिवाय दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या टी-२० मालिकांमध्येही त्याची कामगिरी प्रभावी होती. (T20 World Cup 2026)
(हेही वाचा – T20 World Cup ची Opening Ceremony पाकिस्तानच्या सामन्यात नव्हे, तर भारताच्या सामन्यात; आयसीसीने औकात दाखवली)
२०२५ मध्ये हेजलवूडने १२ बळी घेतले असून त्याची सरासरी १६.५८ आणि इकॉनॉमी ७.३७ इतकी होती. पॉवरप्ले षटकांमध्ये त्याची कामगिरी अधिकच भेदक ठरली होती. डार्विनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३/२७, तर मेलबर्नमध्ये भारताविरुद्ध ३/१३ अशी शानदार कामगिरी त्याने केली होती. “सुपर-८ फेरीपर्यंत जोश तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्याला जबरदस्तीने परत आणणे धोकादायक ठरू शकते. सुरुवातीच्या सामन्यांसाठी आमच्याकडे पुरेसे पर्याय आहेत, त्यामुळे सध्या बदल जाहीर करत नाही,” असं ऑस्ट्रेलियन निवड समितीचे सदस्य टोनी डोडेमेड यांनी म्हटलं आहे. (T20 World Cup 2026)
संघासोबत राखीव खेळाडू म्हणून असलेला सीन अॅबॉट हा हेजलवूडची संघात जागा घेईल हे जवळ जवळ निश्चित आहे. मात्र, सध्या अधिकृत बदल न जाहीर केल्यामुळे निवड समितीकडे पुढील सामन्यांनुसार रणनीती बदलण्याची मुभा राहणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या इतर काही खेळाडूंच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह आहे. अॅडम झाम्पा पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, तर नॅथन एलिस आणि टिम डेव्हिड साखळी सामन्यांपर्यंत तंदुरुस्त होतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. हेजलवूडच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाचं आव्हान खडतर झालं आहे. २००९ च्या चॅम्पियन्स करंडकानंतर हेजलवूड, कमिन्स, स्टार्क, स्टीव्ह स्मिथ किंवा डेव्हिड वॉर्नर यांपैकी एकही खेळाडू संघात नसताना आयसीसी स्पर्धा खेळण्याची वेळ ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच आली आहे. (T20 World Cup 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

