Ind vs Pak : आशिया चषकाच्या भारत – पाक लढतीत रोहित आणि विराटला खुणावतायत वैयक्तिक विक्रम 

आशिया चषकात दोन्ही संघ आमने सामने येतील तेव्हा काही भारतीय खेळाडूंना खुणावत असतील वैयक्तिक मापदंड.

116
Ind vs Pak : आशिया चषकाच्या भारत - पाक लढतीत रोहीत आणि विराटला खुणावतायत वैयक्तिक विक्रम 
Ind vs Pak : आशिया चषकाच्या भारत - पाक लढतीत रोहीत आणि विराटला खुणावतायत वैयक्तिक विक्रम 

ऋजुता लुकतुके

भारतीय संघाची आशिया चषक मोहीम येत्या शुक्रवारी २ सप्टेंबरला सुरू होतेय ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने. ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्मा यांनी बंगळुरूहून रवाना होताना व्यक्त केला होता. भारतीय संघासमोर स्पर्धा जिंकण्याचं लक्ष्य तर असेलच, संघातील ज्येष्ठ खेळाडूंना काही वैयक्तिक विक्रमही खुणावतायत.

संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर संघातील खेळाडूंना कमाल सहा सामने खेळता येतील. आणि या काळात खासकरून विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांना कारकीर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे गाठता येतील.

रोहीत शर्मा (१०,००० एकदिवसीय धावा)

रोहीत शर्मासाठी आशिया चषक ही एक प्रकारे कर्णधार पदाची परीक्षा असेल. त्यामुळे स्वत: रोहीतला आपल्या कामगिरीतून इतर खेळाडूंना प्रेरणा देण्याची इच्छा नक्कीच असणार आहे. तसं करताना त्याची बॅट तळपली तर रोहीत धावांचे वैयक्तिक मापदंड पार करू शकतो.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी रोहीतला फक्त १६३ धावांची गरज आहे. सध्या त्याच्या खात्यात २४४ सामन्यांमधून ९,८३७ धावा जमा आहेत. त्याची धावांची सरासरी आहे ४८.६९ ची. आणि यात त्याने ३० शतकं तसंच ४८ अर्धशतकं ठोकली आहेत. २६४ ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. १०,००० धावा त्याने पार केल्या तर अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज असेल.

विराट कोहली (१३,००० एकदिवसीय तर २६,००० आंतरराष्ट्रीय धावा)

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली तेव्हा विक्रम हे त्याचं दुसरं नाव होतं. आताही आशिया चषकात त्याला आणखी काही विक्रमांना गवसणी घालता येईल.

महत्त्वाचं म्हणजे १३,००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त १०२ धावांची गरज आहे. सध्या त्याच्या खात्यात २७५ सामन्यांमधून १२,८९८ धावा जमा आहेत. त्याची सरासरी आहे ५७.३२ धावांची. आणि यात तब्बल ४६ शतकं आणि ६५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे १८३ धावांची. १३,००० धावांचा टप्पा पार केला तर विराट तसं करणारा सचिन तेंडुलकर नंतरचा फक्त दुसरा भारतीय फलंदाज असेल.

(हेही वाचा- MHADA Lottery : तर म्हाडाचा प्रतीक्षा यादीवरील १६९ अर्जदारांचे भाग्य उजळणार)

त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६,००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी विराटला ४१८ धावांची गरज आहे. सध्या त्याच्या नावावर २५,५८२ धावा जमा आहेत. आतापर्यंत सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ३४,३५७ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्याची विराटला संधी आहे. अर्थात, हे आशिया चषकात होणार नाही. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६ शतकं आणि १३१ अर्धशतकं ठोकली आहेत.

शुभमन गिल (२,००० एकदिवसीय, ३,००० आंतरराष्ट्रीय धावा)

शुभमन गिलने मागच्या दोन वर्षात भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. आता आशिया चषकात त्याला २,००० एकदिवसीय धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला आणखी ५६३ धावा हव्या आहेत. २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये शुभमनने ४ शतकं आणि ६ अर्धशतकांच्या मदतीने एकूण १४२७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरीही ६५ धावांच्या आसपास आहे. शुभमनला ३,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी २९३ धावांची गरज आहे. आणि हे लक्ष्य तो आशिया चषकात नक्की पार करू शकतो.

याशिवाय, रवींद्र जाडेजा, के एल राहुल आणि श्रेयस अय्यरलाही वैयक्तिक मापदंड खुणावत आहेत. रवींद्र जाडेजा ६,००० आंतरराष्ट्रीय धावांपासून फक्त १५३ धावांनी दूर आहे. लोकेश राहुलला ७,००० आंतरराष्ट्रीय आणि २,००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्याची संधी आहे. श्रेयस अय्यर मागच्या दोन वर्षांतील भारताचा सर्वाधिक यशस्वी मधल्या फळीतील फलंदाज आहे. आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा करण्यासाठी त्याला ३६९ धावांची गरज आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.