Sports : ‘युवा’ खेळाडूंसाठी सुधारित ‘जीआर’ तत्काळ जारी करा; राहुल शेवाळे आणि रणजित सावरकर यांची मागणी

युवा खेळाडू म्हणून शासनाच्या निर्णयात आरक्षण नसल्याने खेळाडूंचे भवितव्य अंधारात आहे. त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे.

214

खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आरक्षणासंदर्भात राज्याच्या क्रीडा विभागाने २०१६ साली काढलेल्या शासन निर्णयामध्ये (जीआर) ‘युवा’ असा उल्लेख नसल्यामुळे सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण नाकारले जात आहे. राज्यभरातील ३०० हून अधिक युवा खेळाडूंना याचा फटका बसला असून, पोलीस दलात भरती झालेल्या एका खेळाडूची तर नियुक्तीही थांबवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील युवा खेळाडूंवर होणारा हा अन्याय राज्य शासनाने तत्काळ दूर करावा आणि सुधारित जीआर जारी करावा, अशी मागणी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी सोमवारी केली.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रणजित सावरकर म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा विषयाला घेऊन फार उदासीनता दिसून येत आहे. यामुळे खेळाडूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. युवा खेळाडू म्हणून शासनाच्या निर्णयात आरक्षण नसल्याने खेळाडूंचे भवितव्य अंधारात आहे. त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. शासन निर्णयात ‘युवा’ हा शब्द नसल्यामुळे पोलीस भरती किंवा शासकीय भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात येत नाही. त्याकरिता योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा व शासन निर्णय नव्याने तयार करून खेळाडूंचे नुकसान थांबावावे, अशी विनंती महाराष्ट्र शासनाला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ही उदासीनता दूर करण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घ्यावा आणि शासन निर्णयाद्वारे आरक्षणाच्या तरतुदीत ‘युवा’ हा शब्द तत्काळ समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

(हेही वाचा Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंदूंचे घोषणापत्र जाहीर; काय आहेत मुद्दे?)

महाराष्ट्रातील खेळाडूंची दुसऱ्या राज्यांतून खेळण्यास पसंती

  • महाराष्ट्राच्या आल्फिया पठाणने २०२१ मध्ये पोलंड येथे ‘युथ वुमेन अॅड मैन वर्ल्ड बॉक्सिंग चैंपियनशिप’मध्ये (८१पेक्षा अधिक किलो वजन) युवा गटामध्ये सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवला. गेल्यावर्षी २०२२ मध्ये ओमान (जॉर्डन) येथे झालेल्या ‘एएसबीसी आशियाई एलीट बॉक्सिंग स्पर्धेत (८१पेक्षा अधिक किलो वजन) वरिष्ठ गटात सुवर्ण पदक आणि २०१९ मध्ये फुजारा, दुबई येथे झालेल्या आशियन ज्युनिअर बॉक्सिंग चैंपियनशिपमध्ये ज्युनिअर गटामध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. ‘युथ वुमेन अँड मेन वर्ल्ड बॉक्सिंग चैंपियनशिप’मध्ये आणि ‘आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
  • महाराष्ट्राची बॉक्सिंग खेळाडू देविका सत्यजित घोरपडे हीने नोव्हेंबर २०२२ मध्ये स्पेन येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक मिळविले. ऑगस्ट २०२२ मध्ये दुबई येथे झालेल्या ज्युनियर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ब्राँझ पदक, सप्टेंबर २०२२ मध्ये सर्विया युरोप येथे झालेल्या गोल्डन ग्लोव्हस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकाविले.
  • आल्फिया पठाण आणि देविका घोरपडे या युवा महिला खेळाडूंनी जागतिक स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे व आता सुद्धा जागतिक स्तरावर खेळत आहे. परंतु शासनाच्या निर्णयानुसार बक्षीस, नोकरी, सवलतीस त्या पात्र ठरत नाहीत. आकाश पातोडे या युवा खेळाडूची पोलीस भरतीमध्ये खेळाडू विभागात निवड झाली. परंतु प्रमाणपत्र पडताळणीमध्ये प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल देण्यात आला. परिणामी त्याच्या नियुक्तीचे आदेश थांबविण्यात आले. यामुळे त्याच्यासारख्या खेळाडूचे भवितव्य धोक्यात आले आहे.
  • ३०० हून अधिक युवा महिला व पुरुष खेळाडूंना शासननिर्णयामध्ये शासनाच्या नजरचुकीने युवा (यूथ) हे शब्द नसल्यामुळे युवा खेळाडू शासकीय सवलतीपासून वंचित रहावे लागत आहे. याच कारणांमुळे महाराष्ट्रातील अनेक खेळाडू दुसऱ्या राज्यांतून व विभागातून खेळत आहेत. ही बाब महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय गंभीर आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील युवा खेळाडूंचे फार मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वरील सर्व विषयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊन खेळाडूना शासकीय सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.