R Praggnanandhaa : बुद्धिबळ विश्वचषकातील उपविजेतेपदानंतर प्रग्यानंदला कसला आनंद झालाय?

खेळाला लोकांचं प्रेम मिळतंय याचा खूप आनंद

87
R Praggnanandhaa : बुद्धिबळ विश्वचषकातील उपविजेतेपदानंतर प्रग्यानंदला कसला आनंद झालाय?
R Praggnanandhaa : बुद्धिबळ विश्वचषकातील उपविजेतेपदानंतर प्रग्यानंदला कसला आनंद झालाय?
  • ऋजुता लुकतुके

बुद्धिबळ विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर आर प्रग्यानंद त्याचं गाव चेन्नईत परतला आहे. आणि पत्रकारांशी त्याच्या कामगिरीबद्दल तर तो बोललाच. शिवाय आणखी एका गोष्टीसाठी त्याने आनंद व्यक्त केला.

नुकत्याच संपलेल्या बुद्धिबळ विश्वचषकात उपविजेता ठरलेला १८ वर्षीय प्रग्यानंद बुधवारी भारतात परतला. तो फक्त उपविजेताच ठरला असं नाही. तर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना त्याने हरवलं. आणि अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनला अंतिम फेरीत त्याने तगडी लढत दिली.

या कामगिरीनंतर अझरबैजानची राजधानी बाकूमधून तो चेन्नईत परतला तेव्हा पत्रकारांनी त्याला गराडा घातला. १८ वर्षीय प्रग्यानंदची पहिली प्रतिक्रिया होती, ‘लोकांना बुद्धिबळ माहीत होतंय आणि खेळाला लोकांचं प्रेम मिळतंय याचा खूप आनंद होतोय!’

बाकी स्वत:च्या कामगिरीवर तर तो खूश आहेच. आणि त्यासाठी लोकांचं कौतुक मिळतंय याचाही त्याला आनंद झालाय. चेन्नईत आल्या आल्या प्रग्यानंद तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना भेटला. तेव्हा प्रग्यानंद बरोबर त्याचे वडील रमेशबाबू, आई नागलक्ष्मी आणि त्याचे प्रशिक्षक रमेशही होते. या भेटीबद्दल सांगताना प्रग्यानंद म्हणतो, ‘विश्वचषक स्पर्धा कशी होती. आणि तो नेमका कसा खेळला, हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यांनी माझं अभिनंदन केलं. त्यांच्याशी झालेली चर्चा प्रेरणादायी होती.’

तामिळनाडू सरकारने प्रग्यानंदला ३० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. यामुळे बुद्धिबळ खेळण्यासाठी पाठबळ मिळेल, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. अगदी विमानतळापासून प्रग्यानंदचं झालेलं कौतुक पाहून त्याचे कुटुंबीय भारावून गेले आहेत.

त्याची बहीण वैशाली स्वत: बुद्धिबळ खेळते. तिने मीडियाशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला. ‘यापूर्वी विश्वविजेतेपद मिळवून आनंदसर भारतात आले तेव्हा चेन्नईने सरांचं असं स्वागत केलं होतं. आम्ही तो सोहळा टीव्हीवर पाहिला होता. आता तसंच कौतुक प्रग्याचं होतंय, हे अभिमानास्पद आहे.’

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत प्रग्यानंदने मॅग्नस कार्लसनला अंतिम फेरीत तगडी लढत दिली. त्याने पारंपरिक प्रकारातील पहिले दोन्ही सामने बरोबरीत सोडवले. टायब्रेकरवर मात्र पहिल्याच सामन्यात वेळेच्या बाबतीत तो कमी पडला. आणि पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळतानाही त्याचा पराभव झाला. मग पुढच्या सामन्यात प्रयत्न करूनही त्याला यश मिळालं नाही. पण, त्याने ज्या प्रकारे लढत दिली त्याचं परदेशातही कौतुक झालं. शिवाय या कामगिरीमुळे जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरवणाऱ्या कँडिडेट कप स्पर्धेसाठी त्याला थेट प्रवेश मिळाला हे विशेषच आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.