-
ऋजुता लुकतुके
यंदाच्या हंगामात फॉर्मसाठी धडपडणाऱ्या रोहित शर्माला अखेर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फॉर्म गवसला आणि त्याने ४५ चेंडूंत ७५ धावा करताना षटकार आणि ५ चौकार लगावले. त्याला सूर्यकुमार यादवनेही तितकीच तोला मोलाची साथ दिल्यामुळे दोघांनी मिळून चेन्नईच्या गोलंदाजांची पिसं काढली आणि मुंबईला हा सामना ९ गडी आणि २६ चेंडू राखून जिंकून दिला. रोहितलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि विशेष म्हणजे आयपीएलमध्ये त्याला तब्बल २० वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. याबाबतीत तो भारतीय खेळाडूंमध्ये आता सगळ्यात पुढे आहे. (IPL 2025, MI vs CSK)
रोहित या हंगामात मुंबईची दुसरी फलंदाजी असेल तर इम्पॅक्ट सब म्हणून खेळतो. त्यामुळे तो सामना सुरू होण्यापूर्वी अंतिम अकरा जणांच्या यादीत नसतो. पण, मुंबईच्या डावात त्याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आणलं जातं. आताही चेन्नईविरुद्ध तो फलंदाजीला आला तेव्हा सुरुवातीपासूनच त्याचा मूड काही और दिसत होता. त्याचे फ्लिक्स आणि स्वेअर लेगचे फटके अगदी आधीप्रमाणे बसत होते आणि पहिल्या षटकापासूनच त्याने फटकेबाजी सुरू केली. तो नाबादही राहिला आणि त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. (IPL 2025, MI vs CSK)
(हेही वाचा – Mohammad Azharuddin : हैद्राबादमधील स्टेडिअमवरून मोहम्मद अझहरुद्दीनचं नाव हटवलं, अझर कोर्टात जाणार)
Back to form 🔢
Back making an impact 👊Rohit Sharma wins the Player of the Match award for his match-winning knock 🔥
Scorecard ▶ https://t.co/v2k7Y5tg2Q#TATAIPL | #MIvCSK | @ImRo45 | @mipaltan pic.twitter.com/ZOheqUDHYF
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
रोहित पुन्हा फॉर्ममध्ये परतला ही मुंबई इंडियन्ससाठी अगदी जमेची बाजू आहे. त्याचे फ्लिक आणि पूलचे फटकेही नेहमीसारखे लागत होते. रोहित आणि रिकलटन यांनी मुंबईला ६२ धावांची पायाभरणीही करून दिली. तर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत ६८ धावांचं योगदान दिलं. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी नाबाद ११४ धावांची भागिदारी केली. पण, या सामन्यात रोहितची खेळी लक्षात राहिली. रोहितला आयपीएलमध्ये २० व्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ही कामगिरी करणारा तो अव्वल भारतीय आहे. आयपीएलच्या इतिहासात एबी डिव्हिलिअर्सला सर्वाधिक २५ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर ख्रिस गेलचा क्रमांक लागतो आणि त्यानंतर रोहित शर्मा या यादीत आहे. (IPL 2025, MI vs CSK)
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारे परदेशी खेळाडू :
- एबी डिव्हिलिअर्स – २५
- ख्रिस गेल – २३
- डेव्हिड वॉर्नर – १८
- सुनील नरेन – १६
- शेन वॉटसन – १६
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारे भारतीय खेळाडू :
- रोहित शर्मा – २०
- विराट कोहली – १९
- महेंद्रसिंग धोनी – १८
- रवींद्र जडेजा – १६
- युसुफ पठाण – १६
हेही पहा –
Join Our WhatsApp Community