India Vs Pakistan Asia Cup : आशिया चषकाच्या सुपर फोर लढतीत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा

आशिया चषकाच्या सुपर फोर लढतीत भारताने पाकिस्तान विरुद्धचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय साकारला. के एल राहुल आणि विराट कोहलीची शतकं आणि कुलदीप यादवचे ५ बळी यांच्या जोरावर भारताने २२८ धावांनी पराभव केला

109
India Vs Pakistan Asia Cup : आशिया चषकाच्या सुपर फोर लढतीत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा
India Vs Pakistan Asia Cup : आशिया चषकाच्या सुपर फोर लढतीत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा

ऋजुता लुकतुके

या संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत पावसाने व्यत्यय आणला आहे. पण, इतर सामन्यांच्या वेळी आयोजकांनी जे केलं नाही ते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी केलं. सुपर फोरच्या लढतीत भारत – पाक सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला. इतकंच नाही. तर या दिवशी सामना पहिल्यापासून सुरू करायचा नव्हता, तर जिथे आदल्या दिवशी थांबला असेल तिथून सुरू करायचा होता. भारत – पाक लढत आणि स्पर्धेचा अंतिम सामना यासाठीच फक्त राखीव दिवसाची सोय होती.

यामुळे इतर संघांची चिडचिड झाली. मीडियातही इतर संघांना सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे आरोप झाले. पण, प्रेक्षकांची या तरतुदीला हरकत नसावी. म्हणूनच त्यांनी विक्रमी संख्येनं या सामन्याला प्रतिसाद दिला. डिस्नी हॉटस्टारचे ऑनलाईन प्रेक्षकांचे विक्रम मोडले. आणि शेवटी या राखीव दिवसामुळेच हा सामना पूर्ण होऊ शकला. ११ सप्टेंबरला भारताच्या २ बाद १४५ धावसंख्येवरून सामना पुढे सुरू झाला त्यानंतर जेमतेम ५० षटकांची गरज सामना संपण्यासाठी लागली.

कारण, भारताचा डाव पन्नास षटकं चालला. पण, पाकिस्तानी डाव ३२व्या षटकात १२८ धावांवरच आटोपला. आणि भारतीय संघाने पाकिस्तानवरील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा २२८ धावांनी विजय साकारला. रविवारी हा सामना सुरू झाला तेव्हाच कर्णधार रोहीत शर्मा (५६) आणि शुभमन गिल (५८) यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. आणि पावसामुळे खेळ थांबवावा लागला तेव्हा विराट कोहली ८ तर के एल राहुल १७ धावांवर नाबाद होते.

सोमवारी खेळ १ तास ४० मिनिटं उशिरा सुरू झाला. राहुल आणि विराट दोघंही सुरुवातीला सावध खेळत होते. जम बसवायला दोघांनी वेळ घेतला. पण, अर्धशतक पूर्ण झाल्यावर विराट कोहलीने गियरच बदलला. त्याने नेहमीच्या नजाकतीने पाक गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. शाहीन आफ्रिदी पाकचा या घडीचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज. पण, विराटने फटकेबाजीसाठी त्याचीच निवड केली. आदल्या दिवशी शुभमन आणि रोहीतनेही शाहीनला नीट खेळून काढलं होतं. आज विराटने शाहीनची रयाच घालवली. आणि त्याच्या १० षटकांत ७९ धावा निघाल्या.

विराट कोहलीने ९४ धावांमध्ये नाबाद १२२ धावा करताना ३ षटकार आणि ९ चौकार ठोकले. दुसऱ्या बाजूला के एल राहुलही सुरुवातीला सावधच होता. पण, त्याची पाक विरुद्धची खेळी तो पुन्हा तंदुरुस्त झाल्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असल्याची ग्वाही देणारी होती. त्याने १०६ चेंडूत ११२ धावा केल्या त्या २ षटकार आणि १२ चौकारांच्या सहाय्याने. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद २३३ धावांची भागिदारी केली. आणि भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत दोन गडी गमावत ३५६ धावा केल्या.

(हेही वाचा-Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती)

पावसाने पाकिस्तानच्या डावातही दोनदा व्यत्यय आणला. पण, खरा व्यत्यय पाकच्या लय बिघडलेल्या फलंदाजांनीच आणला. सलामीवीर फखऱ झमानच्या २७ धावा हीच संघातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्या खालोखाल सलमान आघा आणि इफ्तिकार अहमद यांनी २३ धावा केल्या. तर भारताने दिलेल्या अवांतर धावा १७ यांच्यामुळे पाक संघ किमान शंभर धावांचा टप्पा गाठू शकला.

बाकी फलंदाज तर फक्त हजेरी लावून परतले. भारतीय गोलंदाजांनीही आपलं काम चोख बजावलं. जसप्रीत बुमरा दुखापतीतून नुकता सावरलाय. पण, त्याचे चेंडूही दोन्ही बाजूने स्विंग होत होते. तर शार्दूल ठाकूर किफायतशीर होता. पण, या दोघांवर कडी केली ती कुलदीप यादवच्या फिरकीने. ८ षटकात २५ धावा देत त्याने ५ बळी घेतले.

३२व्या षटकात त्यानेच फहीम अश्रफला बाद करत पाकचा डाव संपवला. १२२ धावांच्या खेळीसाठी विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाला आता काही तासांतच श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळायचाय.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.