Ind vs Pak : क्रिकेट बाहेरच्या गोष्टींनी विचलित होऊ नका, कर्णधार रोहितचा साथीदारांना सल्ला 

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट सामना आणि तो ही या दोन देशांमध्येच होणार असेल तर त्यासाठीचं दडपण वेगळं असतं. अशा सामन्यांचा अनुभव असलेल्या कर्णधार रोहित शर्मांने संघ सहकाऱ्यांना दिला आहे ‘हा’ सल्ला

62
Ind vs Pak : क्रिकेट बाहेरच्या गोष्टींनी विचलित होऊ नका, कर्णधार रोहितचा साथीदारांना सल्ला 
Ind vs Pak : क्रिकेट बाहेरच्या गोष्टींनी विचलित होऊ नका, कर्णधार रोहितचा साथीदारांना सल्ला 

ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तानवर ८ गडी राखून मोठा विजय (Ind vs Pak) मिळवल्यानंतर भारतीय संघ आता सज्ज झाला आहे तो पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करायला. अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेड़िअमवर १ लाख ३२ हजार प्रेक्षकांच्या समोर हा सामना होईल. आणि यात क्रिकेटमधील कौशल्याबरोबरच दोन्ही बाजूच्या खेळाडूंचा मानसिक आणि भावनिक कसही लागेल.

कारण, क्रिकेट बरोबरच क्रिकेट बाहेरचे कितीतरी घटक या सामन्यावर प्रभाव टाकत असतात. आताही आधी सामन्यापूर्वी स्टेडिअम उडवून टाकण्याचा निनावी ईमेल मुंबई पोलिसांना आला. त्यावर कारवाई करत गुजरात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यातही घेतलं आहे. पण, भारत, पाक सामना म्हटलं की, अशाच गोष्टींमुळे अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्तही आला.

रविवारच्या सामन्यासाठी शहरात ११,००० सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळेच क्रिकेट बाहेरच्या अशा घटकांचा तसंच क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं खेळाडूंवर येणं स्वाभाविक आहे.

अशावेळी कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट बाहेरच्या घटनांचा खेळावर आणि मानसिकतेवर परिणाम होऊ देऊ नका, असंच त्याचं संघाला सांगणं आहे.

(हेही वाचा-Ind vs Pak : पाक संघही भारता विरुद्धच्या लढतीसाठी अहमदाबादमध्ये दाखल )

कालच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर मीडियाशी बोलताना त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या. खेळाडू म्हणून आमच्या नियंत्रणाखाली असलेल्या गोष्टींवरच आम्ही लक्ष देणार. आमचा संबंध चांगली कामगिरी करण्याशी आहे, असं तो ठासून म्हणाला.

पाकिस्तान (Ind vs Pak) विरुद्धच्या सामन्याविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, ‘खेळाडू म्हणून आम्ही काय करू शकतो, याचाच आम्ही विचार करायला हवा. खेळपट्टी कशी आहे, कोणते खेळाडू खेळवायला हवेत, हा निर्णय आमच्या हातात आहे. बाकी बाहेर घडणाऱ्या गोष्टी आमच्या नियंत्रणात नाहीत. त्या घडतच राहणार. पण, त्यांनी व्यथित होण्याचं कारण नाही,’ असं रोहीतने संघ साथीदारांना उद्देशून सांगितलं.

भारतीय संघ मैदानावरील दडपण सांभाळण्यास सक्षम आहे असा विश्वासही भारतीय कर्णधाराला वाटतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याचं उदाहरण देताना रोहीत म्हणतो, ‘तो आमचा स्पर्धेतला पहिलाच सामना होता. आणि २०० धावांचा पाठलाग करताना २ धावांमध्ये आम्ही ३ गडी गमावले. पण, त्या दडपणातून संघ सावरलाही. आणि तीच आमची जमेची बाजू आहे. मैदानावरील दडपण आम्ही हाताळू शकतो हे विश्वासार्ह आहे.’

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकूण वेळा आमने सामने आले आहेत. आणि यातील सातही सामने  भारतीय संघाने विजय मिळवला आहे. रविवारी भारत – पाक सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने हजर असतील. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह तसंच क्रीडामंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित असतील. याशिवाय शाहरुख खान, आमीर खान अशा बॉलिवूड अभिनेत्यांबरोबरच दोन्ही देशातील माजी खेळाडूही सामन्याला हजेरी लावतील.

भारतीय प्रशासन पाकच्या मीडियाला वेळेवर व्हिसा देत नसल्याची पाक क्रिकेट बोर्डाची तक्रार होती. पण, आता ते व्हिसाही मिळाले आहेत. त्यामुळे भारत – पाक सामन्याचा नेहमीचा माहौल इथं असेल. सामन्याची सुरुवात दोन्ही देशांच्या एकत्र सांगीतिक कार्यक्रमाने होणार असल्याचं समजतंय.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.