
-
ऋजुता लुकतुके
Commonwealth Games 2026 Medal Tally : ग्लासगो येथे झालेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ३९ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. भारतीय खेळाडूंनी १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. नेमबाजी, कुस्ती अशा भारताची पारंपरिक बलस्थानं असलेल्या खेळांचा यंदा स्पर्धेत सहभाग नव्हता. असं असतानाही भारतीयांची ही कामगिरी आणि अव्वल ४ संघांमध्ये मिळवलेलं स्थान महत्त्वपूर्ण मानलं जातंय.
या स्पर्धेतील भारताच्या यशात बॉक्सिंगचा सर्वाधिक वाटा राहिला. भारतीय मुष्टियोद्ध्यांनी तब्बल सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकत पदकतालिकेत मोठी भर घातली. त्याचबरोबर अॅथलेटिक्स, पॅरा-अॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग आणि ज्युडो या खेळांमध्येही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
स्पर्धेची सांगता होण्याच्या एक दिवशी आधी भारताने एका दिवसात १६ पदके जिंकण्याचा विक्रम केला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरी ठरली. या कामगिरीमुळे भारताने चौथे स्थान जवळपास निश्चित केले होते. अंतिम दिवशी भारताच्या खात्यात कोणतेही अतिरिक्त पदक जमा झाले नाही, तरी एकूण कामगिरी समाधानकारक ठरली.
(हेही वाचा – “दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला असता…”; इराणसोबतच्या वाटाघाटीदरम्यान Donald Trump यांचं मोठं विधान! )
यंदाच्या स्पर्धेत भारताच्या ३८ खेळाडूंनी पदके जिंकली. त्यापैकी गुलवीर सिंग हा दोन पदके जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला. तसेच मीराबाई चानूने सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकून आपले वर्चस्व कायम राखले, तर तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये ऐतिहासिक पदक जिंकत भारतीय अॅथलेटिक्ससाठी नवा टप्पा गाठला.
२०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६१ पदके जिंकली होती. यंदा पदकांची संख्या कमी असली, तरी यामागे बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी आणि नेमबाजी यांसारख्या भारताच्या बलस्थान असलेल्या खेळांचा स्पर्धेत समावेश नसणे हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
२०३० मध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या पुढील राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे. त्यामुळे ग्लासगोमधील ही कामगिरी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी उत्साहवर्धक मानली जात असून आगामी मोठ्या स्पर्धांसाठी ती सकारात्मक संकेत देणारी ठरली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
