Veer Savarkar : वीर सावरकरांचे हिंदुत्व आणि राज्यघटना

132
Veer Savarkar : वीर सावरकरांचे हिंदुत्व आणि राज्यघटना
  • महेश कुलकर्णी

भारताला स्वातंत्र्य देणे हे ब्रिटिशांना आवश्यक होते. भारतीय सैन्य ब्रिटिशांबरोबर एकनिष्ठ राहिले नाही आणि उठाव झाल्यावर, ब्रिटिश १८५७ प्रमाणे युरोपीय सैन्य भारतात पाठवू शकत नव्हते. या कारणास्तव त्यांना स्वातंत्र्य देणे अपरिहार्य ठरले. अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की परत भारत जिंकून घेऊ ही सिकंदरी महत्वाकांक्षा मनात ठेऊनच त्यांनी भारत सोडला आणि तोडला. माऊंटबॅटन योजनेमध्ये भारताची अनेक शकले करण्याची बीजे होती. १९४५ पासून भारतात सत्तांतराचे नाट्य रंगवायला सुरुवात झाली. तरीही पूर्वतयारी १९३५ पासून सुरू होती. प्रांतिक सरकारे स्थापन करण्यात हाच हेतू होता. याच सुधारणा कायद्याने एडन मुंबई पासून वेगळे काढले. अरब द्वीपकल्पातील भाग मुंबई पासून वेगळे काढणे समजू शकतो. पण श्रीलंका, ब्रह्मदेश हे वेगळे काढणे, सिंध प्रांत मुंबई प्रांतातून वेगळा काढणे, वायव्य सरहद्द प्रांत पंजाब मधून वेगळा काढणे याचा अन्वयार्थ लावण्याची क्षमता फार कमी नेत्यांमध्ये होती. अशी क्षमता असणाऱ्यांपैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. (Veer Savarkar)

वेव्हेल योजना, त्रिमंत्री योजना यातून वाटाघाटी करत शेवटी माऊंटबॅटन योजनेमध्ये संपूर्ण घाटा आपल्या वाट्याला आला. १९३५ च्या फाळणीनंतर उरलेल्या भारताची अनेक शकले उडवण्याचे धोरण प्रत्यक्षात आले. हे घडविण्यासाठी एक हत्यार म्हणून घटना समितीचाही वापर आंग्लदैत्याने केला. या घटना समितीमध्ये स्वतंत्र प्रज्ञेचे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) येणार नाहीत याची काळजी घेतली गेली. त्यामुळे सावरकरांचे हिंदुत्व विषयक विचार संविधानात येणार नाहीत याचे प्रयत्न केले गेले. घटना समिती ही सार्वभौम नव्हती, ती ब्रिटिश शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार गठित करण्यात आली होती. ती समस्त भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारी तर नव्हतीच. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मसुदा समितीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ ला झाली आणि मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीच्या हाती होते. (Veer Savarkar)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूराष्ट्र विषयक विचार हिंदू राष्ट्र दर्शन या ग्रंथात आहेत. यात हिंदू राष्ट्रातच अन्य संप्रदायाचे लोक सुखात राहू शकतात. किंबहुना राहत आले आहेत असे ते म्हणतात. फाळणीनंतर मुसलमानांना पाकिस्तान दिल्यानंतरही उर्वरित भारतात आज मुसलमान ‘गुण्या’गोविंदाने राहताना दिसत आहेत. जैन, बौद्ध, ख्रिस्ती, पारशी, यहुदी इत्यादी अल्पसंख्यांकांना हिंदू समाजाची अजिबात भीती वाटत नाही ना त्यांचा धर्म धोक्यात येतो. पण हिंदू कोण? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्याख्येनुसार ज्यांची पुण्यभू (धर्माचे सर्वोच्च स्थान) आणि पितृभू (वडिलोपार्जित स्थान) अखंड भारतात आहे ते हिंदू. या व्याख्येनुसार भारत निवासी वैदिक किंवा सनातनी, आर्य समाजी, बौद्ध, जैन, लिंगायत इत्यादी हिंदू गणले जातात. ते म्हणतात की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. अर्थात संविधानात हिंदुत्ववादाला स्थान नाही. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Swati Maliwal मारहाण प्रकरणी विभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला)

स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा ही संस्कृतोद्भव हिंदी असावी असा सावरकरांचा आग्रह होता. परंतु नेहरूंनी नेहमीप्रमाणे हा प्रश्न सोडवलाच नाही. राष्ट्रभाषेऐवजी अधिकृत भाषा असा शब्दच्छल करून पंधरा वर्षांसाठी इंग्रजीचे भूत मानगुटीवर चढवून घेतले. पुढे त्यांच्या सुकन्येच्या राज्यात घटना दुरुस्ती करून अनंत काळासाठी इंग्रजी भारतात अधिकृत भाषा राहील असे ठरविण्यात आले. संविधान हे संपूर्णपणे आंग्लभाषेत ‘ड्राफ्ट’ केले आहे. इंग्लिश लोक रोमनांचे मानसिक दास असल्यामुळे लॅटिन भाषेतील अनेक शब्दांनी आमची गुलामगिरी सजलेली दिसते. १९८७ च्या अठ्ठावन्नाव्या घटना दुरुस्तीनुसार घटना हिंदीमध्ये भाषांतरीत केली आहे. यासंदर्भात आपल्याला स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ कळला नाही असे खेदाने म्हणावे लागते. स्पेनच्या अरबांपासूनच्या स्वातंत्र्याचा थोडाही अभ्यास त्यावेळच्या ‘राष्ट्र निर्मात्यांनी’ केला नाही असे वाटते.तात्पर्य स्वत्व, स्वातंत्र्य या शब्दांचा अर्थ माहित नसल्यासारखे राष्ट्रनिर्माते तेव्हा वागले. (Veer Savarkar)

राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे म्हणून एक प्रकरण आहे. खरे तर स्वतंत्र प्रज्ञेने संविधान निर्मिती करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक तत्वे संविधानात घालायची आवश्यकताच नव्हती. त्याप्रमाणेच संविधान निर्मिती करायची होती. त्या मार्गदर्शक तत्वानुसार गोहत्याबंदी अनुच्छेद ४८, (स्वातंत्र्यवीर गोहत्या करा असे सांगत नव्हते.), समान नागरी कायदा (निर्बंध), अनुच्छेद ४४, हे काही हिंदुत्ववादी भाग संविधानामध्ये मिळतात. जे प्रत्यक्षात आणणे बंधनकारक नाही असे संविधानच सांगते. संविधानाचा बराचसा भाग हा १९३५ चा सुधारणा कायदा आहे. इंग्लंड, आयर्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, वायमार संविधान (हिटलर पूर्व जर्मनी), कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांच्या राज्यघटना अभ्यासून आपले संविधान निर्माण केले आहे. त्यामुळे यामध्ये सावरकरांच्या हिंदुत्व या संकल्पनेचा समावेश नाही. (Veer Savarkar)

(लेखक हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.