Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण

“देश स्वतंत्र झाल्यावर आपल्याला सैन्याची काहीच आवश्यकता नाही त्यामुळे ते विसर्जित करावे“ अशा स्वरूपाची सूचना आपल्या देशातील एका प्रमुख नेत्याने केली होती. याउलट स्वतंत्र भारतात तर मोठ्या प्रमाणावर सैनिकीकरण झाले पाहिजे असे ठाम प्रतिपादन सावरकर करत होते.

279
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण
  • डॉ. गिरीश पिंपळे

एक सप्टेंबर १९३९. दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. या युद्धामुळे ब्रिटिश सरकारला अधिक सैन्यबळाची गरज भासू लागली. या परिस्थितीचा आपण फायदा उठवावा असा विचार चाणाक्ष सावरकरांनी सुरू केला. यानिमित्ताने सैन्यामध्ये हिंदूंची संख्या वाढेल आणि त्यांना आयतेच सैनिकी शिक्षण मिळेल असा त्यांचा विचार होता. हे प्रशिक्षित सैन्य पुढे स्वतंत्र हिंदुस्थानच्या रक्षणासाठी उपयोगी ठरेल अशी त्यांची रणनीती होती. (Veer Savarkar)

“देश स्वतंत्र झाल्यावर आपल्याला सैन्याची काहीच आवश्यकता नाही त्यामुळे ते विसर्जित करावे“ अशा स्वरूपाची सूचना आपल्या देशातील एका प्रमुख नेत्याने केली होती. याउलट स्वतंत्र भारतात तर मोठ्या प्रमाणावर सैनिकीकरण झाले पाहिजे असे ठाम प्रतिपादन सावरकर (Veer Savarkar) करत होते. आपल्या देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी सावरकरांनी एक पत्रक प्रसिद्ध करून तरुणांनी लक्षावधींच्या संख्येने सैन्यात भरती व्हावे असे आवाहन केले. त्यावेळेस आपले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद. त्यांना उद्देशून सावरकर म्हणाले, ‘आपल्या नवजात प्रजासत्ताकाचे रक्षण करण्यासाठी भारताची लढाऊ दले शक्य तितकी सुसज्ज आणि भक्कम बनविण्याच्या आद्य कर्तव्याकडे आपण तातडीने लक्ष पुरवाल अशी मला आशा आहे.’ सावरकरांनी (Veer Savarkar) एकेकाळी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्थेचा सांगता समारंभ पुणे येथे १९५२ मध्ये झाला. या सभेत त्यांनी अतिशय प्रेरक असे भाषण केले. ते म्हणाले, ‘शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले पाहिजे. सुमारे एक कोटी हिंदूंना सैनिकी शिक्षण देऊन आपले वायुदल, भूदल आणि नौदल अद्ययावत केले पाहिजे.’ (Veer Savarkar)

याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी एका व्याख्यानात आपला सैनिकीकरणाचा मुद्दा मोठ्या मार्मिकपणे मांडला. ते उद्गारले, ‘सत्पक्षाला सामर्थ्याचे पाठबळ असले तरच तो असत्पक्षावर विजय मिळवू शकतो. अशोकचक्राच्या पाठीमागे सुदर्शन चक्र असेल तरच अशोक चक्र यशस्वी होईल. संकटकाळात अशोकचक्राने सुदर्शन चक्राची भूमिका घेतली नाही तर ते स्वतः धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही.’ १९५०च्या दशकात अमेरिका आणि रशिया यांच्यात अण्वस्त्र स्पर्धा सुरू झाली. याबाबत आपण मागे राहून चालणार नाही हे द्रष्ट्या सावरकरांनी (Veer Savarkar) वेळीच ओळखले. १९५३ मध्ये केलेल्या एका भाषणात ते म्हणाले, ‘अणुबॉम्बचे रहस्य आणि विज्ञान भारतात आणा. भारत हे एक प्रबळ राष्ट्र बनवा असे माझे या पिढीला सांगणे आहे.’ युद्धशास्त्रातले एक महत्त्वाचे तत्त्व त्यांनी सांगितले होते. ‘जेव्हा लढाई करायची असते तेव्हा आक्रमण करावे’ संरक्षक सैन्य हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे; सैन्य आक्रमक असेल तरच ते राष्ट्राचे संरक्षण करू शकते असे ते म्हणत. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Veer Savarkar: प्रभू रामचंद्र आणि वीर सावरकर)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) अत्यंत पोटतिडीकेने मांडलेल्या या विचारांकडे त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले; कारण त्यांना सावरकरांची ‘एलर्जी’ होती. पण सावरकरांचे विचार शिरोधार्य मानणाऱ्या पक्षाचे सरकार २०१४ मध्ये आपल्या देशात स्थापन झाले आणि त्यानंतर मात्र चित्र पूर्णपणे बदलले. आपल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला ‘घरात घुसून मारू’ असा खणखणीत इशारा दिला आणि ते शब्द खरे करून दाखवले. १८ सप्टेंबर २०१६ या दिवशी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमधील उरी येथे असलेल्या आपल्या लष्करी तळावर हल्ला करून १९ जवानांचे प्राण घेतले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करून जोरदार प्रत्युत्तर दिले. १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारतासाठी काळा दिवस ठरला; कारण त्यादिवशी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर मोठा हल्ला झाला. आपल्या राज्यकर्त्यांनी या घटनेला जशास तसे उत्तर देण्याचा निश्चय केला आणि २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून लक्ष्यभेदी हल्ला केला. २६ फेब्रुवारी हा सावरकरांचा आत्मार्पण दिन. त्यादिवशी त्यांना वाहिलेली ही सुयोग्य अशी श्रद्धांजलीच होती! या सरकारच्या काळात चीनने जेव्हा जेव्हा भारतात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा सरकारने त्याला तत्काळ रोखले ही गोष्ट आपण पाहिली आहे. (Veer Savarkar)

भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली. त्यातील सर्वात लक्षवेधी क्षेपणास्त्रे म्हणजे ब्राह्मोस. याचे महत्त्व असे की याच्या मदतीने अण्वस्त्र हल्ला करता येतो. आता आपण ब्राह्मोस दुसऱ्या देशांनासुद्धा विकत आहोत. ड्रोन, अणुपाणबुडी, विमानवाहू नौका, राफेल विमाने, एफ १६ विमाने अशा अनेक गोष्टींची निर्मिती/खरेदी करून आपला देश लष्करीदृष्ट्या बळकट होत आहे. सावरकरांच्या (Veer Savarkar) आत्मार्पणाला आता ५८ वर्षे पुरी होत आहेत. पण इतक्या प्रदीर्घ काळानंतरही त्यांचे सैनिकीकरण या विषयावरचे विचार कालबाह्य झालेले नाहीत. आपली वाटचाल आज त्याच विचारांच्या प्रकाशात चालू आहे ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. (Veer Savarkar)

(लेखक सावरकर चरित्राचे अभ्यासक आणि वक्ते आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.