चारचाकी गाडी रस्ता सोडून ठाण्यातील खाडीच्या चिखलात फसली आणि…

96

एका कारमधून ६ जण ठाण्यातील कोलशेत खाडी रोड परिसरात फिरायला गेले असताना, ती कार रस्ता सोडून खाडीच्या किनारी चिखलात गेली आणि त्यामध्ये अडकली. त्या कारमध्ये सहा जण अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांना यश आले आहे. सुदैवाने यामध्ये कारमधील कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

असा घडला प्रकार

मुंबईतील चेंबूर परिसरात राहणारे ६ जण ठाण्यातील वागळे इस्टेट या ठिकाणी एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर हे सहाही जण कार घेऊन ठाण्यातील कोलशेत खाडी या ठिकाणी फिरायला आले होते. त्यावेळी फॉर्च्युनर कार रस्ता सोडून खाडी किनाऱ्यालगतच्या चिखलात गेली आणि फसली. ही घटना रविवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.

टोयोटा फॉर्च्युनर कार ही हरेंद्र सिंग यांच्या मालकीची असून त्या कारवर चालक संकेत सिंग (२८) हा आहे. त्याच्यासह कारमध्ये रोहित नायर, हेनेरी जोन, ईश्वरी खैरे, पूजा रतुरी आणि अश्विनी कुमार हे सहा जण चेंबूर परिसरात राहणारे आहेत. हा प्रकार घडला असता कापूरबावडी पोलीस, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेत, बचाव कार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या त्या सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. तसेच या वेळी १ आपत्कालीन निविदा आणि १ -रेस्क्यू वाहन आणि १ हायड्रा क्रेनला पाचारण केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.