Happy Mahashivaratri : महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

182
Happy Mahashivaratri : महाशिवरात्र कशी साजरी करावी ?
Happy Mahashivaratri : महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र (Happy Mahashivaratri) असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत ‘माघ कृष्ण चतुर्दशी’ या तिथीला करतात. या वर्षी महाशिवरात्र 8 मार्च या दिवशी आहे. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. (MahaShivaratri Wishes) त्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या काही कृतींमागील शास्त्र –

शिवपिंडीवर अभिषेक करा !

भगवान शिवाला शक्यतो दुधाचा अभिषेक करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो. दूध हे शक्तीचे प्रतीक असल्याने त्याचा अभिषेक शिवपिंडीवर केला जातो, हे त्यामागचे अध्यात्मशास्त्र आहे. असे केल्याने त्याचा पूजकाला आध्यात्मिक लाभ होतो.

(हेही वाचा – MahaShivaratri Wishes : महाशिवरात्रीच्या निमित्ताने आप्तस्वकियांना द्या ‘या’ शुभेच्छा… जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व)

शिवपिंडीला हळद-कुंकू ऐवजी भस्म लावा !

हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये. कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात. भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.

शिवाला बेल वहा !

शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर शिव संतुष्ट होतो. बेलाची पाने तारक शिव-तत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

पांढर्‍या अक्षता वहा !

अक्षतांकडे (धुतलेले अखंड तांदूळ) निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्‍या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्‍या रंगाच्या अक्षता वहा.

शिवाला पांढरी फुले वहा !

शाळुंकेला निशिगंधा, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १० च्या पटीत त्यांचे देठ शिवपिंडीकडे करून वहावीत.

शिवाला कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ?

उदबत्ती आणि अत्तर यांतून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्‍या गंधांच्या उदबत्त्यांनी तीन वेळा ओवाळावे आणि केवड्याचे अत्तर वापरावे.

पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्‍हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्‍हणजे सोमाच्‍या दिशेकडे मंदिराच्‍या विस्‍ताराच्‍या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्‍हणजे नाला जातो, त्‍याला सोमसूत्र म्‍हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास, तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही. (Happy Mahashivaratri)

(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘शिव’)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.