अबब….नशेची औषधे विकून तिने कमावली ‘इतकी’ संपत्ती

रुबिना शेख ही एनसीबी आणि मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्ह्यातील वॉन्टेट आरोपी होती.

77

नशेच्या बाजारातील लेडी डॉन म्हणून ओळखली जाणारी रुबिना शेख हिच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल, मुंबईतच नाही तर मुंबईच्या बाहेर देखील तिने कोट्यवधी रुपयांची संपत्ती बनवली आहे. या लेडी डॉनला नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने नुकतीच अटक केली आहे. रुबिनाने मागील काही वर्षांत नशेचे सामान विकून १२ कोटी रुपयांची संपत्ती बनवली असल्याचे चौकशीत उघडकीस आले. रुबिना नियाज शेखला एनसीबीने अटक केली त्यावेळी सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला.

रुबिना वांद्रे येथील झोपडपट्टीत राहणारी!

रुबिना शेख ही एनसीबी आणि मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी होती. एनसीबीने मागच्याच आठवड्यात तिला गुजरातच्या उंझा, मिरा दातार येथून अटक केली आहे. एनसीबीने तिच्या जवळून मोठ्या प्रमाणात एमडी हा अमली पदार्थ, ७० लाखांची रोकड आणि ३० लाख किंमतीचे दागिने हस्तगत केले होते. वांद्रे, माहीम, कुर्ला, कसाईवाडा, मुंब्रा परिसरात नशेचा व्यापार चालवणारी रुबिना शेख हिचा बॉस निलोफर सांडोले हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मूळची मुंबईतील वांद्रे येथील झोपडपट्टीत राहणारी रुबिनाने सुरुवातीला नशेचा धंदा हा वांद्रे झोपडपट्टी येथून सुरू केला.

(हेही वाचा : भावना गवळींना ‘वर्षा’ वर ‘नो एन्ट्री’?)

४० ड्रग्स पेडलर्स तिच्यासाठी काम करत होते!

हळूहळू तिचे प्रस्थ वाढले आणि तिने मुंबईतील काही स्लम आपल्या हाती घेऊन तिकडे आपली माणसे पेरून त्या ठिकाणी अमली पदार्थाची विक्री सुरू केली. ४० ड्रग्स पेडलर्स तिच्यासाठी कुर्ला, कसाई वाडा माहीम कॉजवे, भिवंडी, मुंब्रा आणि वांद्रे येथे ड्रग्स विक्रीचा व्यवसाय करतात. नशेच्या बाजारात रुबिनाला लेडी ड्रग्स माफिया डॉन म्हणून ओळखले जाते. या धंद्यातून तिने काही वर्षातच कोट्यवधी माया जमवली. कुर्ला येथे तिचा ५० लाखांचा फ्लॅट असून, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ३ कोटी रुपयांचा प्रशस्त आणि आलिशान बंगला तीने बांधला आहे. मुंब्रा येथे आलिशान फ्लॅट असून या फ्लॅटची किंमत ४० लाखाच्या जवळपास असेल, माहीम कॉजवे या ठिकाणी चाळीत रुबिनाने नातेवाईकाच्या नावावर तीन खोल्या खरेदी केलेल्या आहेत. मिरारोड या ठिकाणी रुबिनाने मोठ्या प्रमाणात मालमत्ता घेतल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली असून चौकशी सुरू असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. रियल इस्टेटमध्ये तिने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचा संशय एनसीबीची अधिकाऱ्यांना आहे.

निलोफर सांडोले ही रुबिनाची बॉस

माहीम येथे राहणारी निलोफर सांडोले ही रुबिनाची बॉस असून माहीम येथील एका चाळीत छोट्या खोलीत राहणाऱ्या निलोफर हिची परिसरात मोठी दहशत होती, निलोफर आणि रुबिना या दोघी चोरी करणारी टोळी चालवत होती. हळूहळू दोघींच्या अमली पदार्थाच्या धंद्यात शिरकाव करून कमी वेळातच दोघी नशेचा बाजारातील लेडी डॉन बनल्या, रुबिना ही निलोफरच्या इशाऱ्यावर ड्रग्सचे धंदे चालवत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.