जी-२० परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती जगभर पोहोचणार

103

जी-२० परिषदेसाठी जगभरातून आलेल्या विविध देशाच्या प्रतिनिधींना राज्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वारसास्थळे, कृषी पर्यटन, वन्यजीव पर्यटनाची माहिती मिळावी, यासाठी सांताक्रूझ येथील ग्रँड हयातमध्ये छोटेखानी प्रदर्शन (स्टॉल) उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यटनस्थळांची माहिती जागतिक पातळीवर पोहचण्यास मदत होईल, असे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

(हेही वाचा – Indian Railway: रेल्वे प्रवाशांनो तिकीटांचे दर वाढणार? संसदेत रेल्वेमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले…)

लोढा म्हणाले की, राज्याला लाभलेला समुद्रकिनारा, विविध पर्यटन स्थळे यांची माहिती, तसेच राज्याचे कृषी पर्यटन, राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसास्थळे आणि वन्यजीव पर्यटन वाढावे यासाठी पर्यटन विभाग सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जबाबदार पर्यटन संकल्पना राबविण्यात येत असून, त्याची इंग्रजी माहिती पुस्तिका परिषदेतील प्रतिनिधींना देण्यात येत आहे. अजिंठा, वेरुळ, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील आर्ट डेको इमारतींचे समूह आणि पश्चिम घाटाचा भाग म्हणून चार नैसर्गिकस्थळे, सहा जागतिक वारसा स्थळे यांची माहितीही या स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पर्यटन विभाग अधिक शाश्वत सर्वसमावेशक पर्यटनाचा अवलंब करून, पर्यटन क्षेत्रात अधिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनापश्चात सुरक्षित प्रवास

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पर्यटन विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोविडनंतर महाराष्ट्राने पर्यटनाच्या सर्व विभागांसाठी नियमावली जारी केली आहे. आता महाराष्ट्रात प्रवास करणे आणि राहणे सुरक्षित आहे याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत या प्रदर्शनाच्या माध्यमातून देता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जबाबदार पर्यटनाबाबत माहिती पर्यटकांना देण्यात येत आहे. जी-२० च्या माध्यमातून जागतिक पातळीवर राज्यातील सांस्कृतिकस्थळे, ऐतिहासिक वारसास्थळे, कृषी पर्यटन याची माहिती देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दिली.

परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे माहितीपत्रक

ग्रँड हयात येथील स्टॉलमध्ये माहिती देताना एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल म्हणाले, महाराष्ट्रीयन परंपरा आणि संस्कृतीची दर्शन घडवणारे माहितीपत्रक पर्यटन विभागाने तयार केले आहेत. राज्याने नव्याने तयार केलेल्या डायमंड सर्किट- मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये माहितीपत्रक तसेच माहिती देणारे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहेत. १६ डिसेंबर पर्यंत या स्टॉलच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.