सावरकरांचे एकतागान…

129

एका मुलाखतीत ‘कांतारा’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व अभिनेते ऋषद शेट्टी म्हणाले, ‘भारतीय प्रेक्षक खूप संवेदनशील आहे. त्यांना आपल्या सांस्कृतिक मुळांना धरून असलेल्या कलाकृती बघायला आवडतात. काही फिल्म मेकर्सचा असे चित्रपट चालणार नाहीत असा गैरसमज होता. पण प्रेक्षकांना वेगळ्याच कथा बघायच्या आहेत. त्यांना त्यांच्या मुळांशी जोडलेल्या, आपल्या मातीतील कथा मोठ्या पडद्यावर बघायच्या आहेत.’ भारतीय लोकांची नाळ भारतीय धर्म-संस्कृतीशी, परंपरेशी जोडलेली आहे.

नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकरांवरील व्याख्यानमालेचा समारोप करताना कॉम्रेड हिरेन मुखर्जी यांनी श्रोत्यांना एक संस्कृत श्लोक ऐकवला,
‘माता मे पार्वती देवी | पिता देवो महेश्वरः ||
बान्धवाः मानवः सर्वे | स्वदेशी भुवनत्रयं ||

त्यानंतर ते म्हणाले, ‘या श्लोकाचे स्मरण आपण सदैव केले पाहिजे व या स्मरणाच्या प्रकाशात आपल्या समाजातील विषमता व उच्चनीचता पार मिटवली पाहिजे.’ थोडक्यात आपल्या समाजातील लोकांची आपल्या संस्कृतीवर नितांत श्रद्धा आहे व आपल्यातील भेदभाव नष्ट करायचा असेल तर समोर मार्क्स, लेनिन इत्यादी परदेशी प्रतिके न ठेवता भारतीय संस्कृतीचाच आधार घेतला पाहिजे, असे कॉम्रेड हिरेन मुखर्जी यांना देखील वाटत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुंचे एकतागान ही कविता लिहिली आहे. सावरकर लिहितात,
‘तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधुबंधु |
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू ||’
आपण सारे हिंदू आहोत आणि आपल्याला बांधणारा एक धागा म्हणजे तो महादेव आहे. हिंदुत्वाची व्याख्या करताना सावरकरांनी हिंदू धर्माला विरोध केला नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्यात जे भेदभाव झाले, स्पृश्य-अस्पृश्य ही भावना निर्माण झाली, ती आपल्या संस्कृतीमुळे नव्हे, तर आपण आपली संस्कृती विसरलो म्हणून भेदभाव निर्माण झाले. आपल्या पूर्वजांनी तर वसुधैव कुटुंबकम म्हटले होते, जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले होते. मग इतका व्यापक विचार करणारा हिंदू धर्म भेदभाव कसा शिकवेल?

त्यामुळे सावरकरांनी देवाला रिटायर करा, असे नाही म्हटले तर सत्यानारायणाच्या पोथीत आणखी एक अध्याय जोडा असे म्हटले. आपल्या लोकांना जर एकत्र आणायचे असेल तर प्रेरणा देण्यासाठी भारतीय महापुरुषच हवे किंबहुना एक राष्ट्र म्हणून पुढे जायचे असेल तर आपली संस्कृती, आपला इतिहास भारताच्या दृष्टीकोनातून सकारात्मक पद्धतीने सांगायला हवा. म्हणूनच भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने हा दिव्य ग्रंथ जन्माला आला.

हिंदुंचे एकतागान या कवितेतील मला आवडलेल्या ओळी म्हणजे,
ब्राह्मण वा क्षत्रिय चांग | जरि झाला ||
कसलेहि रुप वा रंग | जरि ल्याला ||
तो महार अथवा मांग | सकलाला ||
ही एकचि आई, हिंदुजाति आम्हाला, तिला वंदू व|
तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधुबंधु |

सावरकर एकतेचे गाणे गात आहेत आणि हे गाणं गाताना हे आपल्या संस्कृतीचा आधार घेत आहेत. सावरकरांनी नेहमीच वाईट प्रथांना विरोध केला आणि आपल्या संस्कृतीतील जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते लोकांसमोर मांडले. सावरकरांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. हिंदू एकत्र येत आहेत. हिंदूंना आपले चांगले आणि वाईट कळू लागले आहे. म्हणूनच हिंदू द्वेष्ट्यांमधले आता हिंदू-प्रेम जागृत होत आहे; सावरकरांच्या भाषेत सांगायचे तर कोटावरुन जानवे घालण्याचे दिवस हिंदू द्वेष्ट्यांवर आले आहेत. हिंदू एकमेकांना बंधू समजू लागला आहे. सावरकरांनी लिहिलेल्या ‘हिंदुंचे एकतागान’ या कवितेस आता खरा अर्थ प्राप्त होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.