Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मार्साय

338
  • मंजिरी मराठे

८ जुलै अर्थात साहसदिन – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी ८ जुलै १९१० या दिवशी फ्रान्सच्या मार्साय बंदरात अथांग सागरात उडी घेतली. त्या धाडसाचा, त्या अफाट साहसाचा हा स्मरण दिन. विशेष म्हणजे याच मार्सायला सावरकर १९०६ मध्ये सुद्धा गेले होते. पण चारच वर्षांनी याच मार्सायमध्ये सावरकर इतिहास घडवणार होते.

९ जून १९०६ ला स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला जाण्यासाठी पर्शिया बोटीवर चढले. खरंतर बॅरिस्टर होणं हे एक निमित्त होतं. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा प्रसार महाराष्ट्रात झाला होता, भारतभर होऊ लागला होता. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना अभिनव भारतचा प्रसार करायचा होता. हिंदुस्थानात ब्रिटिशांनी शस्त्र बंदीचा कायदा केला होता आणि शस्त्रावाचून क्रांती अशक्य होती त्यामुळे लंडनमध्ये येणाऱ्या इतर अनेक देशांच्या क्रांतिकारकांशी संधान बांधून सावरकरांना शस्त्रास्त्रं मिळवायची होती, बॉम्ब बनवण्याची कृती मिळवायची होती. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडायचा होता, कारण भारतीयांनाच स्वातंत्र्य नको आहे असा खोटा प्रचार बिटीश करत होते.

पर्शिया बोट फ्रान्सच्या मार्साय बंदरात थांबली. सावरकरांचा पुढचा लंडनपर्यंतचा प्रवास आगगाडीनं होणार होता. गाडीला वेळ होता. त्यामुळे त्यांनी मार्सायमध्ये फेरफटका मारायचं ठरवलं. सावरकरांचा १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास होता. त्या क्रांतीतील प्रलयंकारी काळात ज्या रणगीतानं साऱ्या फ्रान्सचं अंत:करण पेटून उठलं ते रणगीत गात क्रांतिकारकांच्या चतुरंग सैन्यानं बेभान होऊन इंग्लंड, स्पेन, ऑस्ट्रिया आदि देशांच्या परकीय सेनांचा चक्काचूर केला होता. पुढे शंभर वर्ष या रणगीताला फ्रान्सच्या राष्ट्रगीताचा मान मिळाला. मार्सायमधल्या Rouget De Lisle या कवीनं लिहिलेलं मार्सेलेझ हे रणगीत अत्यंत त्वेषानं गात मार्सायमधील बोटावर मोजण्याइतक्या क्रांतिकारकांची पहिली तुकडी पॅरिसकडे निघाली आणि त्या तुकडीमुळे मार्सेलेझ हे रणगीत साऱ्या फ्रान्सभर निनादू लागलं.

(हेही वाचा Veer Savarkar : सावरकरद्वेषापोटी काँग्रेसचा गीता प्रेसला दिलेल्या पुरस्काराला विरोध; हिंदू अधिवेशनात काँग्रेसचा निषेध)

स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र चळवळ करण्याच्या अपराधासाठी जोसेफ मॅझिनी यांना इटलीतून हद्दपार करण्यात आलं तेव्हा त्यांनी मार्सायमध्येच आश्रय घेतला होता. कोणाशी ना ओळख, ना पाळख, ना धड अन्न, ना वस्त्र असं निर्वासिताचं जीवन जगत असतानाही जोसेफ मॅझिनी यांनी त्याच मार्सायमध्ये ‘यंग इटली’ या गुप्त क्रांतिकारी संस्थेची स्थापना केली. इटलीवर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रियानं त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. पण त्याची अंमलबजावणी फ्रान्समध्ये होऊ शकत नसल्यामुळे त्यांनी मार्साय सोडलं नाही. ऑस्ट्रियन शासनानं फ्रान्सवर दबाव आणल्यामुळे मॅझिनी यांना फ्रान्स सोडून जाण्यास सांगण्यात आल्यावर ते भूमिगत झाले. पुढे क्रांतिकारक ज्यावेळी इटलीत उठाव करणार होते त्यावेळी त्यांनी स्वत:हून मार्साय सोडलं.

लंडनला जाताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनी यांचं इंग्रजी चरित्र बरोबर घेतलं होतं. जहाजावरच्या आपल्या नवीन सहकाऱ्यांना त्यांनी ते वाचायलाही दिलं होतं. त्यामुळेच जिथं ‘तरुण इटली’ या क्रांतिकारी संघटनेचा जन्म झाला त्या मॅझिनी यांच्या कर्मभूमीला भेट देण्याचं, त्यांचं निवासस्थान पहाण्याचं सावरकरांनी निश्चितच योजलं असणार. मार्सायला पोहोचताच त्यांनी वाटाड्याला त्याबाबत सांगितलं, पण त्यानं मॅझिनी हे नावही ऐकलेलं नव्हतं. ‘पत्ता सांगा, घेऊन जातो’ असं तो वाटाड्या म्हणाला, तर ‘इटलीत जाऊन मॅझिनीचा पत्ता विचारा, मिळाला तर तिकडेच मिळेल’, असं तिथल्या एका वृत्तपत्राच्या संपादकानं सांगितलं. मग सावरकरांनाच वाटलं की, मॅझिनी गुप्तपणे कार्य करत होते, भूमिगत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल फ्रान्सच्या नागरिकांना माहीत नसणं हा त्यांचा दोष नव्हता, दोष ती चौकशी करणाऱ्या माझा होता. आज मी, भारतातला एक क्रांतिकारक मार्सायमध्ये भटकतो आहे, त्याची कुठे कोणी दखल घेतली आहे तसंच मॅझिनींचं झालं असणार.

अर्थात याच मार्सायमध्ये चारच वर्षांनी, ८ जुलै १९१० ला सावरकरांनी एका महापराक्रमाची नोंद केली. त्यांच्या ऐतिहासिक उडीमुळे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला. फ्रान्सच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्रिखंडात गाजलेल्या त्या उडीमुळे, १९०६ मध्ये ज्या सावरकरांना फ्रान्समध्ये कोणी ओळखत नव्हतं त्या स्वातंत्र्यवीर सावरकर या भारतातल्या महान क्रांतिकारकाचं नाव जगभर निनादू लागलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.