Shiv Jayanti : आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष

गेल्या वर्षी पहिल्यांदाच आग्र्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला होता.

151

महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ठिकठिकाणी यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा उत्सव आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मान्यवर नेतेमंडळींची या सोहळ्याला हजेरी लागली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा हलवला. त्याचवेळी गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या आग्र्यावरील शिवजयंती उत्सवाचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी आग्र्यामध्ये शिवरायांच्या जयंतील उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आग्र्यात ३९४व्या जयंतीचा उत्साह!

गेल्या वर्षी पहिल्यांदाच आग्र्यात शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव साजरा करण्यात आला. यंदा या उत्सवाचे दुसरे वर्ष असून त्याची जोरदार तयारी आग्र्यात करण्यात येत आहे. ३९४व्या शिवजयंती उत्सवासाठी आग्रा नगरी सजली असून आज संध्याकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. रात्री साधारण १० वाजेपर्यंत या सोहळ्यात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आग्र्यातील या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा Shiv Jayanti : शिवजयंती सोहळ्यासाठी शिवनेरी सज्ज; मंत्र्यांच्या आगमनानंतरही शिवभक्त गडावर येऊ शकणार)

याच ठिकाणी महाराजांचा अपमान झाला होता

जेव्हा शिवरायांना फसवून औरंगजेबाने आग्र्याला आणले होते, त्यावेळी त्याच आग्र्यातील दिवाणी ‘दिवाण-ए-आम’मध्ये भरवलेल्या दरबारात महाराजांना मुजरा करण्याचे फर्मान औरंग्याने सोडले होते. त्यावेळी मराठा साम्राज्याचे आणि हिंदवी स्वराज्याचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंग्याला आपण स्वतः राजा असून आपला उचित सन्मान झाला पाहिजे असे ठणकावून सांगत औरंग्याला त्याच्याच दरबारात चोख उत्तर दिले होते. त्याच ‘दिवाण-ए-आम’मध्ये मागील वर्षांपासून मोठ्या धुमधडाक्यात शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी होऊ लागली आहे. यंदाच्या वर्षी दांडपट्टा हे शस्त्र राजशस्त्र म्हणून घोषित केले जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.