देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक!

158

भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. तर आपला इतिहास अतिशय जाज्वल्य आणि वैभवशाली आहे. प्रत्येक कालखंडात आपण परकीय आक्रमकांना धैर्याने लढा दिला आहे. इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये वापरली गेलेली नाणी हे त्या इतिहासाचा पुरावा आहे. त्यामुळे देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

( हेही वाचा : Police Bharti : राज्यात १४,९५६ जागांसाठी पोलीस भरती; ‘या’ तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया )

नाणेशास्त्र विषयातील तज्ज्ञ व लेखक डॉ. दिलीप राजगोर लिखित ‘रिपब्लिक कॉन्स ऑफ इंडिया’ (भारतीय गणराज्यातील नाणी) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

जो इतिहास विसरतो त्याला भविष्य देखील विसरते असे सांगून जुनी नाणी इतिहासाची महत्वपूर्ण कडी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. लेखक डॉ. दिलीप राजगोर यांनी नाण्यांच्या विश्वात मोठे संशोधन करुन भारत गणराज्य निर्मितीनंतरच्या नाण्यांची अभ्यासपूर्ण माहिती पुढे आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. गणराज्याची नाणी हे पुस्तक युवकांकरिता प्रेरणास्रोत व अभ्यासकांकरिता मैलाचा दगड सिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

जुनी नाणी जमवणे हा केवळ छंद नसून आपला इतिहास जाणून घेण्याचे एकमात्र माध्यम असल्याचे नाणे संग्राहक व हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी सांगितले. नाणी जमा करणे सोपे काम आहे परंतु त्याबद्दल ऐतिहासिक पुराव्यांसह लिहिणे कठीण काम असून त्यासाठी मोठे धैर्य लागते असे त्यांनी सांगितले. नाणी म्हणजे केवळ चलन नसून त्यात निहित सौंदर्य व इतिहास आहे, असे अब्राहम यांनी सांगितले. रिपब्लिक कॉईन्स ऑफ इंडिया या पुस्तकात सन 1947 ते 2022 या काळात देशात चलनात आलेल्या सर्व नाण्यांची संदर्भासह अभ्यासपूर्ण माहिती आहे. यापूर्वी ‘सल्तनत कॉईन्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक देखील प्रकाशित केले असल्याचे डॉ. दिलीप राजगोर यांनी सांगितले. यावेळी राजगोर यांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिवराय’ हे नाणे भेट दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.