New Year 2024 : १ जानेवारीपासून हे अर्थविषयक बदल ठरतील महत्त्वाचे 

१ जानेवारीपासून अर्थविषयक क्षेत्रात कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत त्यावर एक नजर टाकूया 

162
New Year 2024 : १ जानेवारीपासून हे अर्थविषयक बदल ठरतील महत्त्वाचे 
New Year 2024 : १ जानेवारीपासून हे अर्थविषयक बदल ठरतील महत्त्वाचे 

ऋजुता लुकतुके

१ जानेवारी २०२४ पासून (New Year 2024) अर्थविषयक काही गोष्टी बदलणार आहेत. आणि ग्राहकांनी त्याविषयीची नीट माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. सरकारी गुंतवणूक योजनेपैकी दोन योजनांवरील व्याजदर वाढणार आहेत. तर तुमच्या विम्याच्या कागदपत्रांमध्येही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. वापरात नसलेली युपीआय खाती बंद होतील. आणि नवीन सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला केवायसी प्रक्रिया ऑनलाईन आणि तिथल्या तिथे करता येईल. आता हे चार महत्त्वाचे बदल विस्ताराने पाहूया

बचत योजनेवरील वाढलेले व्याजदर 

सरकारी योजनांवरील सुधारित व्याजदर शुक्रवारी सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, सुकन्या समृद्धी योजना या सरकारच्या फ्लॅगशिप योजनेवरील व्याजदर जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत २० अंशांनी वाढवण्यात आले आहेत. सुधारित व्याजदर ८.२ टक्के इतका असेल.

३ वर्षं मुदतीच्या मुदतठेवीवरील व्याजदरही ७.१ टक्क्यांवर आणले आहेत. अर्थ मंत्रालयाने नवीन पत्रक काढून सुधारित दरांची घोषणा केली आहे. हे दर अर्थातच १ जानेवारीपासून लागू होतील.

(हेही वाचा-WFI Row : कुस्तीच्या तात्पुरत्या समितीने केली राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा )

चारचाकी वाहनं महाग होणार 

टाटा मोटर्स, आऊडी, मारुती सुझुकी आणि मर्सिडिझ बेंझ या कंपन्यांनी आधीच नवीन वर्षापासून गाड्यांच्या किमती वाढणार असल्याचं जाहीर केलं आहे. सुट्या भागांच्या किमती वाढल्यामुळे ही दरवाढ करत असल्याचं ऑटो कंपन्यांचं म्हणणं आहे. किमती नेमक्या किती वाढणार हे अजून स्पष्ट नसलं तरी २ ते ३ टक्कांनी कार महाग होतील असा अंदाज आहे. प्रिमिअम श्रेणीतील कारच्या किमती आणखी वाढतील असं बोललं जात आहे.

वापरात नसलेले युपीआय आयडी बंद होणार 

१ जानेवारीपासून वापरात नसलेले युपीआय आयडी बंद व्हायला सुरुवात होणार आहे. युपीआय प्रणालीची नियामक संस्था एनपीसीआयने नोव्हेंबरमध्येच तसे निर्देश युपीआय ॲपना दिले होते. आता त्याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

म्हणजे गुगलपे, फोनपे, पेटीएम किंवा इतर कुठलंही थर्डपार्टी युपीआय ॲप तुम्ही वापरत असाल. पण, वर्षभरापेक्षा जास्त काळ यात कुठलाही व्यवहार झालेला नसेल तर असं खातं आता रद्द होईल. या खात्यांची सुरक्षितता आणि फोन नंबर बदलल्यामुळे वापरात नसलेली खाती बंद व्हावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विम्याची कागदपत्र बदलणार 

तुमच्या आरोग्य विम्याची सुधारित कागदपत्र १ जानेवारीपासून तुम्हाला मिळायला लागतील. तुम्हाला आरोग्य विम्याबरोबर त्यात समाविष्ट असलेल्या सुविधा आणि विविध प्रक्रिया यांची माहिती देणारं एक पत्रक देण्यात येतं. पण, यात लिहिलेली माहिती अनेकदा क्लिष़्ट, न समजणारी आणि कायदेशीर भाषेत असते. त्यामुळे आयआरडीएआय अर्थात, विमा नियामक मंडळाने विमा कंपन्यांना हे माहितीपत्र सोप्या आणि ग्राहकांना समजेल अशा भाषेत लिहिल्याची सक्ती केली आहे.

१ जानेवारीला तुमच्याकडे असलेल्या आरोग्य विम्याची माहिती तुम्हाला सोप्या भाषेत मिळू शकेल. आणि अशी नवीन कागदपत्र तुमच्या घरी घरपोच होतील.

सिमकार्डसाठी ऑनलाईन केवायसी 

तुम्हाला मोबाईल सिम कार्ड घ्यायचं असेल तर आतापर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागत होता. आणि त्याला तुमची काही ओळखपत्र जोडावी लागत होती. ही प्रक्रिया आता सुटसुटीत होणार आहे. केवायसी म्हणजे ‘नो युवर कस्टमर’ ही प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल किंवा ऑनलाईन होईल. आणि ग्राहकांना जमा केलेल्या ओळखपत्राची सत्यता तिथल्या तिथे तपासून सिमकार्ड मिळू शकेल.

सिमकार्डचे होणारे घोटाळे यामुळे कमी होतील. तसंच मोबाईल कंपन्यांची नवीन सिमकार्ड देण्याची प्रक्रिया कमी खर्चाची होईल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.