आंबोली घाटातील अवजड वाहतूक बंद करा; मनसेचा पोलिसांना इशारा

116

आंबोली घाटात होणारी अवजड वाहतूक पोलिसांनी त्वरित थांबवावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते स्वतः त्या ठिकाणी पहारा देऊन हे ‘रात्रीस खेळ चाले’चे खेळ लवकरच जनतेसमोर उघडकीस आणतील, असा इशारा सावंतवाडी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. तशा आशयाचे निवेदन शुक्रवारी मनसेतर्फे सावंतवाडी पोलिसांना देण्यात आले.

आंबोली घाटात ‘रात्रीस खेळ चाले’चा खेळ 

या निवेनात म्हटले आहे, सध्या आंबोली घाटातून पुन्हा बेकायदेशीरपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.  पोलिसांकडून ही वाहने सोडली जात असून यामागे गुपित काय? असा सवाल उपस्थित होत आहे. त्या ठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक रात्रीच्या वेळेस होते नेमके ‘रात्रीस खेळ चाले खेळ’ आंबोली घाटात कोणाच्या आशीर्वादाने होतात? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्याभरात या घाटात दोन अवजड वाहतूक करणाऱ्या कंटेनर तसेच डंपरच्या वाहनांना अपघात झाला असून याला जबाबदार कोण? त्याचप्रमाणे प्रशासनाने ही बाब गंभीर घ्यावी अन्यथा भविष्यात बेळगाव कोल्हापूरकडे जाणारा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

बेकायदेशीरपणे अवजड वाहनांचा प्रवास

गेली दोन वर्षे आंबोली घाटातील सुरक्षेच्या कारणास्तव होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आंबोली घाटातील दरडी सातत्याने कोसळत असल्यामुळे तसेच घाट रस्ता खचत असल्यामुळे अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोना महामारी टाळेबंदी कालावधीत देखील घाटातून होणारी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आंबोली येथे पोलीस दुरक्षेत्र तसेच तपासणी नाका असून या नाक्यावरून पोलिसांकडून रात्री उशिरा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना बेकायदेशीरपणे सोडले जात आहे. गेल्या आठवड्याभरात सलग दोन मोठ्या वाहनांना घाटात अपघात झाला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही तरी ही वाहने सोडण्यामागे पोलिसांचा नेमका हेतू काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचा – ‘तो संप बेकायदेशीर होता’, रूजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची हमीपत्रावर स्वाक्षरी)

…तर मनसेचे कार्यकर्ते स्वतः पहारा देणार

सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोली घाटाच्या सुरक्षेच्या कारणावरून हे निर्बंध घातले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून काटेकोर पणे करणे आवश्यक आहे. अशा वाहनांवर दंड आकारण्यात येऊन त्यांना वाहतूक करण्यास बंदी घालणे आवश्यक आहे तरी आंबोली घाटातूंन होणारी अवजड वाहतूक रोखण्यात यावी प्रसंगी अशा वाहनांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करत आहोत. ही वाहने कोणाच्या दबावाखातर सोडली जात असल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जावी त्याचप्रमाणे सदर आंबोली घाटात होणारी अवजड वाहतूक आपल्या मार्फत त्वरित थांबवावी अन्यथा येथील मनसेचे कार्यकर्ते स्वतः त्या ठिकाणी पहारा देऊन हे रात्रीस खेळ चालेचे खेळ लवकरच जनतेसमोर उघडकीस आणलीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.