Mecca जवळील ड्रोन हल्ल्याबद्दल भारताने व्यक्त केली चिंता; सौदीच्या सार्वभौमत्वावरील हल्ल्यांचा निषेध

Mecca जवळील ड्रोन हल्ल्याबद्दल भारताने व्यक्त केली चिंता; सौदीच्या सार्वभौमत्वावरील हल्ल्यांचा निषेध

13
Mecca Drone Attack
Mecca Drone Attack

Mecca Drone Attack : सौदी अरेबियातील इस्लाम धर्मीयांच्या पवित्र मक्का शहराजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नाबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाच्या सार्वभौम भूभागावर होणारे हल्ले तसेच नागरिकांचे जीवन आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण करणाऱ्या कारवायांचा भारताने निषेध केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी १६ सप्टेंबर रोजी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना भारताची भूमिका स्पष्ट केली. “मक्केजवळील ड्रोन हल्ल्याबद्दल आम्ही अत्यंत चिंतित आहोत,” असे त्यांनी सांगितले. जगभरातील मुस्लिमांसाठी मक्केला असलेले विशेष धार्मिक महत्त्व लक्षात घेता, या घटनेबद्दल भारताने विशेष चिंता व्यक्त केली.

सौदी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येमेनमधील हुती बंडखोरांकडून मक्केच्या दिशेने पाठवण्यात आलेला ड्रोन सौदी हवाई संरक्षण यंत्रणेने मक्केच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच अडवून नष्ट केला. मात्र, हुतींकडून मक्केला किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य केल्याचा दावा नाकारण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. नागरिकांचे जीवन आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण करणाऱ्या हल्ल्यांचा भारताने निषेध केला असून, पश्चिम आशियात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मक्केजवळील या घटनेमुळे पश्चिम आशियातील वाढत्या तणावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सौदी अरेबिया आणि हुतींमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भागातील सुरक्षा परिस्थितीवर भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.