मुश्रीफांचा पलटवार, ठोकणार १०० कोटींचा दावा

राजकारणात, समाजकारणात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष घालवावे लागतात, कष्ट करावे लागतात. पण तिला कुणीही यावे आणि डाग लावावा ही परिस्थिती आली. माझ्यावर आधी असे आरोप झाले, तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा.

86

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले असून, मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर आता हसन मुश्रीफ आक्रमक झाले असून, सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणालेत. किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसावं. ते कोल्हापूरला आले असते, तर त्यांना स्पष्टपणे खरी परिस्थिती समजली असती, असे देखील मुश्रीफ यावेळी म्हणालते.

(हेही वाचा : आता राष्ट्रवादीचे मुश्रीफ सोमय्यांच्या रडारवर)

नेमकं काय म्हणालेत मुश्रीफ
किरीट सोमय्या यांनी माझ्या पक्षाविरूद्ध, पवार साहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOCच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आले असते. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्रे दिली आहेत. आपण नवे काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळाले नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
तसेच हजारो शेतकऱ्यांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आपला कारखाना हवा होता. त्यावेळी सरकारने सहकारी कारखान्यांची नोंदणी बंद केली होती. म्हणून हा प्रायव्हेट लिमिटेड कारखाना काढावा लागला. ज्या दिवशी आम्हाला परवाना मिळाला आणि आवाहन केले, तेव्हा एकाच दिवशी १७ कोटी रुपये जमा झाले. ४ दिवस लोक नोटा मोजत होते. कारण सगळ्या शेतकऱ्यांना ५, १०, ५० रुपयांच्या देखील नोटा दिल्या होत्या. त्यानंतर हजारो लोकांनी पैसे दिले. त्याची देखील कोल्हापूरच्या आयकर विभागाकडून तपासणी झाली. हजारो शेतकऱ्यांची चौकशी झाली. बँकांची पासबुके देखील तपासली. त्यानंतर देखील हे पैसे आले असे हसन मुश्रीफ म्हणाले.

१७ वर्षांत माझ्यावर एकही आरोप नाही
मी १७ वर्ष या राज्यात मंत्री आहे. माझ्यावर एक साधा आरोप झाला नाही, चौकशी झाली नाही, कुणी चर्चा केली नाही. भाजपाच्या काळात चिक्की घोटाळा, मुंबईचा गृहनिर्माण घोटाळा असे घोटाळे या काळात झाले नाहीत. माझ्यावर तर कधीच आरोप झाले नाहीत असे देखील मुश्रीफ म्हणाले. राजकारणात, समाजकारणात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष घालवावे लागतात, कष्ट करावे लागतात. पण तिला कुणीही यावे आणि डाग लावावा ही परिस्थिती आली. माझ्यावर आधी असे आरोप झाले, तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा. वास्तविक माझ्यावर लोकांचा विश्वास आहे, त्याला तडा जाऊ नये यासाठी आता मी सोमय्या यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.