पालिका निवडणुकीआधी शिवसेनेत भूकंप, पक्षातले नाराज भाजपच्या गळाला

हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना नितेश राणे यांनी शिवसेनेचे काही नाराज गळाला लागल्याचे संकेत दिले आहेत.

111

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने तर शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनीती देखील आखली असून, भाजप आमदार नितेश राणे, प्रसाद लाड हे भाजपचे नेते आतापासूनच शिवसेनेला धक्कातंत्र देण्यासाठी तयार झाले आहेत.

(हेही वाचाः बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असतानाही राज्यात हिंदू धोक्यात! राणेंची जळजळीत टीका)

भाजपचे हे नेते सध्या शिवसेनेच्या नाराजांना गळाला लावण्यासाठी सज्ज झाले असून, शिवसेनेत नाराज असलेले आणि गळाला लागू शकतात अशांची यादीच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना सुपूर्द केली आहे. हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना नितेश राणे यांनी शिवसेनेचे काही नाराज गळाला लागल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीआधी शिवसेनेत मोठे भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

गळाला जेवढे लागले आहेत त्यांची यादी देवेंद्र फडणवीस आणि लोढा यांच्याकडे दिली आहे. त्यांनी फक्त त्यावर आता टीकमार्क मारायची, मग आम्ही त्यांना पक्षामध्ये आणू. तसेच कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा आहे. तो निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. पण आमच्याकडे असलेली यादी आम्ही त्यांना सुपूर्द केली असल्याचे नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचाः होय, ती माझी चूकच होती! वीर सावरकरांवरील वक्तव्यावर नितेश राणेंची कबुली  )

म्हणून शिवसैनिक नाराज

तीन पक्षांचे सरकार असले तरी मूळ शिवसैनिक आज नाराज आहे, त्याला न्याय मिळालेला नाही. हे नातेवाईकांचे सरकार असेल तर शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी काय करावे, असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडू लागला आहे. बाळा सावंत हे कडवट शिवसैनिक होते. तरी देखील तृप्ती सावंत या आमच्या पक्षात आल्या. या कुटुंबांना जर भाजपा आपला पक्ष वाटत असेल, तसेच हिंदुत्व मांडणारा पक्ष वाटत असेल, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष वाटत असेल, तर भाजप हाच योग्य पक्ष आहे. अशा नाराजांची यादी फार मोठी असल्याचे नितेश राणे म्हणाले. तसेच नगरसेवक किती निवडून आणायचे हे येणारा काळ ठरवेलच. आमचा प्रयत्न एवढाच आहे की आम्हाला मुंबईला न्याय द्यायचा आहे, असे सांगत नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

(हेही वाचाः राडे करायला शिवसैनिक हवेत, पदं मात्र नातेवाईकांना- नितेश राणे)

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.