गुन्हेगारी मुक्त तरुणाई घडवणे काळाची गरज – न्या.संदिप स्वामी

130

सुसंस्कृत समाज व्यवस्थेपासून दुरावणाऱ्या आणि गुन्हेगारी सारख्या कुसंस्कृतीकडे वळणाऱ्या तरुणाईला गुन्हेगारी मुक्त करणे काळाची गरज बनली आहे असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तसेच धुळे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश संदिप स्वामी यांनी धुळे तालुक्यातील लळींग येथे आयोजित कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिरात बोलतांना केले.

( हेही वाचा : राज्यात दुर्मिळ ‘माळढोक’ पक्ष्याचे पुन्हा दर्शन! पहा कुठे दिसला…)

सर्वसामान्य लोकांना कायद्याबाबत योग्य ती माहिती, कायद्याचे ज्ञान मिळावे तसेच याविषयीचे त्यांचे हक्क व अधिकार त्यांना कळावेत या प्रमुख उद्देशाने देशभरात ३१ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान कायदेविषयक जनजागृती अभियान राबविले जात आहे. या अभियानाची सुरुवात धुळे जिल्हा ग्रामीण भागापासून करण्यात आली. न्यायालयात कोणतेही प्रकरण किंवा कोणतीही कायदेशीर प्रक्रिया चालविण्यासाठी सर्वसामान्य जनतेला मोफतपणे विधी सेवा व सहाय्य देणे, खर्च व वेळेची बचत करून प्रकरणांचा जलदगतीने न्यायनिवाडा करणे, विकलांग व्यक्ती, महिला, बालके, अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती यासारख्या अन्य दुर्बल घटकांना न्याय व्यवस्थेची मोफत सुविधा उपलब्ध करून देणे असे समाजाभिमुख उपक्रम न्याय व्यवस्थेमार्फत राबविले जातात याची सविस्तर माहिती देखील यावेळी न्या.संदिप स्वामी तसेच न्या.ए.बी.चव्हाण यांनी शिबिरात मार्गदर्शन करतांना उपस्थित नागरिकांना दिली. सद्यस्थितीला तरुण पिढी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत असून तरुणांचा सहभाग असलेल्या अशा विविध प्रकरणांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपला समाज सक्षम व सुदृढ करण्यासाठी आणि तरुणाईला गुन्हेगारी पासून वाचवण्यासाठी तरुण पिढीला योग्यरितीने घडवणे आवश्यक आहे. याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम त्वरीत दिसून येईल असा आशावाद न्या.संदिप स्वामी यांनी मार्गदर्शनात बोलतांना व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी न्या.संदिप स्वामी, न्या.ए.बी.चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.