सायबर गुन्ह्यांमध्ये चार पटीने वाढ; सक्षम यंत्रणेअभावी उकल करण्यात अपयश

114

मुंबई शहरातील सायबर गुन्ह्यांमध्ये मागील चार महिन्यांत चार पटीने वाढ झाली आहे. मात्र सायबर गुन्ह्याची उकल करण्यास सायबर विभाग आणि पोलिसांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारकडे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी तितकी सक्षम यंत्रणा नसल्यामुळेच सायबर गुन्हेगारावर अंकुश आणता येत नसल्याचे पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत एकट्या मुंबईत ३,२५६ गुन्हे दाखल झाले असून या पैकी केवळ १९० गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबईत ३०२ सायबर गुन्ह्यांची नोंद

सायबर गुन्हेगारी ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी झालेली आहे. सायबर गुन्हेगारांकडून दररोज नवनवीन प्रकारे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. या फसवणुकीच्या जाळ्यात केवळ सामान्य अथवा मध्यमवर्गीय अडकत नाही तर उच्चशिक्षित, अधिकारी वर्ग राजकारणी हे देखील सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकत आहेत. फोटो, व्हिडीओ मोर्फ करून ब्लॅकमेल करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची खंडणी उकळण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली. जानेवारी २०२२ मध्ये मुंबईत ३०२ सायबर गुन्ह्याची नोंद झाली त्यापैकी केवळ १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

(हेही वाचा – बंद पडलेली वनराणी होणार पर्यावरणप्रेमी!)

फेब्रुवारी महिन्यात या गुन्ह्यात दुपटीने वाढ होऊन त्याची संख्या ५३६ झाली तर ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. मार्च महिन्यात ही आकडेवारी ९६२ झाली तर एप्रिल महिन्यात १४६८ गुन्ह्याची नोंद एकट्या मुंबईत झाली. चार महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याची आकडेवारी ३,२५६ झाली असून त्यापैकी केवळ १९० गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. गुन्हे उघडकीस आले असले तरी फसवणूक झालेली रक्कम वसूली करण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांचे नुकसानच झाले आहे.

पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे गुन्हेगारांपर्यंत पोहचणे अवघड

काही पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, सायबर विभागात मनुष्यबळाची कमी, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडे पुरेशी तांत्रिक यंत्रणा नसल्यामुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहचणे अवघड होत आहे. गुन्हेगार परराज्यात बसून हे गुन्हे करीत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागतो, त्यामुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहचणे अवघड होत असल्यामुळे गुन्ह्याची उकल होत नसल्याचे मत अधिकाऱ्यांनी मांडले. राज्य सरकारकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पुरेपूर तांत्रिक यंत्रणा, मनुष्यबळ तसेच सायबर एक्सपर्ट दिल्यास या गुन्ह्यांवर आळा आणून गुन्ह्याची उकल करण्यात येईल असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.