Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

153
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व
चेतन राजहंस

चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदूंचा नववर्षारंभदिन (hindu culture)! या दिवशी घरोघरी गुढ्या उभारून हिंदु नववर्षाचे (hindu new year) स्वागत केले जाते. अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रा काढल्या जातात. यंदा गुढीपाडवा ९ एप्रिल या दिवशी आहे. या निमित्ताने गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया. (Gudi Padwa 2024)

नैसर्गिक महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक महत्त्व

१. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस

२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला. गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ही ऐतिहासिक कारणे आहेत.

३. गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) इंद्राने दिलेली कळकाची काठी उपरिचर राजाने इंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुस-या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतो. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.

आध्यात्मिक महत्त्व

सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा पृथ्वीचा वर्षारंभदिन

‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. गुढीपाडवा या दिवशी सुरू होणा-या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणा-या तेजोमयी दिवसाशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात.’

पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ

‘वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणा-या ब-या वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो; म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते. याची काही उदाहरणे पाहू.

अ. पाऊस लवकर चालू होणार असेल, तर त्या बेताने शेताची मशागत अगोदर करून ठेवता येते.

आ. पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण अल्प असेल, तर अशा वेळी विहिरी इत्यादींचा उपयोग व्हावा; म्हणून लागणारे पाट, ताली इत्यादी सर्व साहित्य नीट करून ठेवता येते.

इ. दुष्काळ पडणार असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार वा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठा करता येतो अन् येणा-या अडचणीच्या काळाची व्यवस्था करून ठेवता येते.

ई. कोणती पिके होण्याचा संभव आहे, ते जाणून त्याप्रमाणे बियाणे, खत इत्यादी आणून ठेवता येते.’ (Gudi Padwa 2024)

(लेखक सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.