आधी वंदू तुज मोरया !- दा.कृ.सोमण

240

‘विद्यारम्भे विवाहेच प्रवेश निर्गमे तथा।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥’

म्हणजे विद्यारंभ, विवाह व इतर संस्कारांच्या वेळी , प्रवेश यात्रा, संग्राम आणि संकटकाळी जो विघ्नेश म्हणजे गणपतीचे पूजन किंवा स्मरण करील त्याची विघ्ने दूर होतील असे सांगण्यात आले आहे. श्रीगणेश हा विद्या-कलांचा अधिपती आहे, तो सुखकर्ता आहे दु:खहर्ता आहे. आज प्रथम श्रीगणेशाला वंदन करूया.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. पार्थिव म्हणजे मातीच्या मूर्तीचे गणेशपूजन करावयाचे आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्यामुळे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून अन्नधान्य देणाऱ्या पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात असते. तसेच श्री गणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती, गणांचा नायक त्याचे हे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी ही आदर्शाची पूजा करायची असते. लहानपणी शिकलेली गणेश वंदना तुम्हाला आठवत असेल
‘प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी ॥’

कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करतांना प्रथम श्रीगणेशाचे स्मरण केले जाते, श्रीगणेशाची पूजा करावयाची असते. याविषयी पद्मपुराणामध्ये एकसष्टाव्या अध्यायात एक कथा आहे. ही कथा महर्षी व्यासानी संजयाला सांगितलेली आहे. विशेष म्हणजे या आधुनिक काळातही ही कथा उद् बोधक आहे.

शंकर पार्वतीला स्कंद आणि गणेश अशी दोन मुले होती. एक दिवस सर्व देवांनी श्रद्धेने अमृतापासून तयार केलेला दिव्य मोदक पार्वतीला दिला. पार्वतीपाशी ही दोन्ही मुले त्या मोदकासाठी हट्ट करू लागली. पार्वती मुलांना म्हणाली ‘हा मोदक खाणारा अमर होऊन सर्व विद्या , शास्त्र व कला यामध्ये निपुण होईल. तसेच सर्व लोक शुभ कार्यारंभी त्याचे स्मरण व पूजन करतील. परंतु हा मोदक तुमच्यापैकी एकालाच देणार आहे. जो धार्मिक भावनेने सिद्धी प्राप्त करून पृथ्वी प्रदक्षिणा करून प्रथम इथे येईल त्यालाच मी हा मोदक देईन.’ हे ऐकून स्कंद सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी मोरावर विराजमान होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी निघाला. गणेशाने मात्र आपल्या आईवडिलांची पूजा केली, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि स्कंद येण्यापूर्वी पार्वतीपुढे हजर झाला.

नंतर सर्व तीर्थयात्रा आटोपून स्कंद आला. दोघेही मोदकासाठी हट्ट करू लागले. पार्वतीने गणेशाची प्रशंसा केली आणि सांगितले ‘आई-वडिलांच्या पूजेचे पुण्य व सिद्धी ही इतर कुठल्याही सिद्धीपेक्षा महान व श्रेष्ठ आहे. त्यामुळे मी हा दिव्य मोदक गणेशालाच देणार आहे.’ गणेशाला मोदक देताना शंकर-पार्वतीनी गणेशास वर दिला की, ‘तुला यज्ञयागात , वेदशास्त्र स्तवनात, नित्यपूजा विधानात अग्रक्रम मिळेल.’

ही कथा जरी प्राचीन काळच्या पुराणातील असली तरी महान संदेश देणारी आहे. आधुनिक काळात काही मुले आई-वडिलांच्या वृद्धापकाळी त्यांचा नीट सांभाळ करीत नाहीत. काही मुले तर त्यांना दूर वृद्धाश्रमात ठेवतात. त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही कथा आहे. आई-वडिलांची सेवा ही महान सिद्धी आहे. कोणतेही कार्य करतांना संकल्प करून मनाची एकाग्रता केली की कार्य सफल होण्यास मदत होते. कार्यारंभी आपले मनोबल वाढल्याने प्रयत्नात सातत्य राहते, कार्य यशस्वी होण्यास मदत होते. शुभ कार्यारंभी श्रीगणेशाचे स्मरण व पूजन यासाठीच करावयाचे असते.

विद्यांचा अधिपती

श्रीगणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो बुद्धिदाता आहे. गणपतीच्या उपासनेमध्ये अथर्वशीर्ष पठनाला विशेष महत्त्व आहे. अथर्वशीर्ष हे अथर्ववेदामध्ये समाविष्ट केलेले आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषींनी लिहिले आहे. ‘थर्व’ म्हणजे हलणे, अस्थिर! ‘अथर्व’ म्हणजे स्थिर ! अथर्वशीर्ष हे शीर्ष स्थिर ठेवणारे म्हणजे बुद्धी स्थिर ठेवणारे आहे. अथर्वशीर्ष पठणाने बुद्धी व मन स्थिर होऊन हाती घेतलेले शुभकार्य यशस्वी होण्यासाठी बळ प्राप्त होते अशी गणेश उपासकांची श्रद्धा आहे. मनोबल चांगले असेल तर कार्य यशस्वी होण्यास मदत होते हे आधुनिक मानसशास्त्रही सांगते. निर्भयता प्राप्त झाल्याने आपली ताकद वाढत असते.

महर्षी व्यासांनी महाभारत लेखनासाठी श्रीगणेशाला बोलावले होते. चौदा विद्यांचा अधिपती गणपती याची पूजा करणे म्हणजे त्याच्या आदर्शाची पूजा करणे होय. त्या विद्या आपणास प्राप्त व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणे होय. या चौदा विद्या आणि चौसष्ट कला कोणत्या ते प्राचीन ग्रंथात सांगितलेले आहे. (१) ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद (४) अथर्ववेद (५) छंद (६) शिक्षा (७) व्याकरण (८) निरुक्त (९) ज्योतिष – खगोलशास्त्र (१०) कल्प (११) न्याय (१२) मीमांसा (१३) पुराणे आणि (१४) धर्मशास्त्र अशा या प्राचीनकालच्या चौदा विद्या श्रीगणपतीला अवगत होत्या. आधुनिक काळात आणखी अनेक विद्या उदयास आल्या आहेत. गणपतीची उपासना करणे म्हणजे या विद्या शिकणे होय. माणूस विद्येत पारंगत असेल तर सन्मार्गाने स्वत:चे जीवन सुखी करू शकतो. अडचणी- संकटे यांवर मात करू शकतो आणि इतरांच्या जीवनातही आनंद सौख्य निर्माण करू शकतो. जीवनाचे यातच सार्थक असते.

विद्येची उपासना करणे म्हणजेच श्रीगणेशाची उपासना करणे होय. विद्या माणसाच्या व्यक्तिमत्वात महत्त्वाची भर घालते. विद्या हे छुपे धन असते. विद्या उपभोग, कीर्ती व सुख मिळवून देते. विद्या ही गुरुंचीही गुरू आहे. विद्या ही माणसाला माणसाशी आणि निसर्गाशी माणसासारखे वागायला शिकवते. म्हणून आपण विद्येचे उपासक झालो पाहिजे. विद्या आणि कला यांचा अधिपती श्रीगणेश आपला सर्वांचा आदर्श आहे, या आदर्शाची पूजा आपण केली पाहिजे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.