Festivals : सण केवळ धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय झाले पाहिजेत

आता गल्लोगल्लीत गणेशोत्सव मंडळे स्थापन झाल्यामुळे प्रत्येक गल्लीत राष्ट्रीय भावना जागृत करण्याची नामी संधी चालून आलेली आहे.

105
Festivals : सण केवळ धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय झाले पाहिजेत
Festivals : सण केवळ धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय झाले पाहिजेत
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्रातील जनता आनंदात आहे. मुंबईच्या गल्लोगल्लीत गणपती मंडळे स्थापन झाली आहेत. १० दिवस हे कार्यकर्ते गणरायाची सेवा करणार, मनोभावे पूजा करणार. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भावविश्वाने गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांवर व्याख्याने आयोजित केली आहेत. पूर्वी गणेशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्यास राष्ट्रीय स्पर्श देखील होता. आता गल्लोगल्लीत गणेशोत्सव मंडळे स्थापन झाल्यामुळे प्रत्येक गल्लीत राष्ट्रीय भावना जागृत करण्याची नामी संधी चालून आलेली आहे. हा नियम घरी गणपती बसवणाऱ्यांसाठी देखील लागू होतो.

महाराष्ट्र सरकारने ‘हर घर सावरकर’ या उपक्रमाद्वारे ‘भव्य गणपती सजावट स्पर्धा २०२३’ हा उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये यावर्षी सावरकर यांच्या समग्र जीवनावर आधारित ही सजावट असणार आहे. म्हणजे जिथे गणपती तिथे सावरकर. गणपतीचे एक नाव विनायक, सावरकरांचे नाव देखील विनायक आहे. गणपती गणांचा अधिपती तर सावरकर देशभक्तांचे सेनापती. त्यामुळे हा सुंदर योग जुळून आलेला आहे. सावरकरांचे म्हणणे असे होते की आपल्या सणांमध्ये राष्ट्रीय भावना असली पाहिजे. याच हेतूने त्यांनी अखिल हिंदू गणेशोत्सव सुरु केला. गल्लोगल्लीत गणेश मंडळे स्थापन झाल्याची तक्रार काही मंडळी करत असतात. या बुद्धिवंतांच्या मते गणपती उत्सव टिळकांनी चांगल्या कामासाठी सुरु केला होता, मात्र काही मंडळांमध्ये जुगार खेळला जातो, काही तरुण मंडळी उच्छाद मांडताना दिसतात, वाह्यात गाण्यांवर हिडीस नाच करतात. त्यामुळे एका विभागासाठी एक गणेशोत्सव मंडळ असायला हवे असे काही जणांचे म्हणणे आहे.

हा आरोप खरा असला, ही मागणी रास्त असली तरी नेहमी टिका करुन, बळजबरी करुन कामे होत नाहीत. आपण कोणत्याही परिस्थितीचं रुपांतर संधीमध्ये करु शकतो. सावरकरांनी अंदमानसारख्या तुरुंगातही प्रबोधनात्मक काम करुन क्रांती घडवून आणली. ते तक्रार करत बसले नाहीत. त्यांनी प्रबोधनाचे कार्य युद्धपातळीवर आणि युद्धासारखे केले आहे. सरकार आणि मोठमोठ्या संस्था ज्या राष्ट्रीय भावनेने कार्य करतात, त्यांनी पुढाकार घेऊन या गणपती मंडळांना भेट देऊन गणेशोत्सव का साजरा करायचा हे सांगितले पाहिजे. संध्याकाळी आरती झाल्यावर हिंदु राष्ट्राच्या कल्याणासाठी गणरायाकडे सामूहिक साकडे घातले पाहिजे. जी २० शिखर परिषद, चंद्रयान इत्यादी भारताची बलस्थाने याबद्दल गणपती मंडळांत चर्चासत्र आयोजित केले पाहिजे. या सर्व गोष्टी मनोरंजनाच्या मार्गाने झाल्या तर सामान्य जनतेपर्यंत लवकर पोहोचतील.

(हेही वाचा – Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा केंद्राचे उद्घाटन)

मंडळांमध्ये राष्ट्रीय जाणीव असलेल्या एकांकिका, गीते सादर झाली पाहिजेत. लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी मनोरंजक कथा सांगितल्या जातात. समाजाचं मन हे लहान मुलासारखं असतं. त्यांना मनोरंजन आवडतं. याचा अर्थ त्यांना राष्ट्रीय जाणीव नाही असे नव्हे. मात्र, मनोरंजनाच्या माध्यमातून राष्ट्रीय जाणीवेचे कार्यक्रम आयोजित केल्यास ते जनतेच्या मनाचा ठाव घेतील. समाजात परिवर्तन घडवून आणायचे आहे. मात्र प्रत्येक वेळी हातात टीकेची छडी घेतलीच पाहिजे असे नव्हे. अविरत प्रबोधनाचे गोड बोल देखील पुरेसे आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरु केलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. ही सरकारी पातळीवरील सुरुवात आहे. आता मोठमोठ्या संस्थांनी या प्रबोधनात्मक कार्यात उडी घ्यायला हरकत नाही. केवळ मंडळेच नव्हे तर घराघरातील गणेशोत्सवात देखील हे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. आपण हिंदू उत्सवप्रिय असतो असा आरोप आपल्यावर होत असतो. आता या उत्सवांचे रुपांतर राष्ट्रभक्तीत करावे लागणार आहे आणि त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. बदल नक्कीच घडेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.