Chandrayaan Mission Success : चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा – मुख्यमंत्री शिंदे

या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे

104
Chandrayaan Mission Success : चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री शिंदे
Chandrayaan Mission Success : चंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री शिंदे

भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.

इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्दल आनंद साजरा केला. तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. ‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे. परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज ‘चंद्रयान ३’ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा – Chandrayaan 3 : चंद्रयान मोहीम यशस्वी; पंतप्रधान मोदी म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण)

इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, देशवासीयांचे अभिनंदन – अजित पवार

  • ‘चंद्रयान ३’ ने चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींग मुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चंद्रयान ३’ च्या यशाने जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.
  • ‘चंद्रयान ३’ च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे. समस्त देशवासियांच्या एकजुटीतून मिळालेले हे यश असल्याचे सांगत ‘चंद्रयान ३’ मोहिमेत योगदान दिलेल्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशवासीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात देश यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चंद्रमोहिमेच्या यशाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहिम राबवण्यात आली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले.
  • महाराष्ट्रानेही आपले योगदान दिले. मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आले. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर, तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
  • इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली पन्नास वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चंद्रयान ३’ च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचेही मोठे योगदान असून तेही कायम लक्षात ठेवले जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.