‘वर्षा’ बंगला मुख्यमंत्र्यांचा नव्हताच… वाचा काय होते बंगल्याचे खरे नाव

वर्षा हे नाव या बंगल्याला कसं पडलं आणि या बंगल्याचा नेमका इतिहास काय हे आपण जाणून घेऊया.

241

राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत जेव्हा केव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्या शासकीय निवासस्थानाचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. खरंतर मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या या बंगल्यात भाडेकरु तत्वावर राहत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री बदलले की त्यांचा ‘वर्षा’ बंगला नेहमीच चर्चेत असतो. पण हा वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचा कधीच नव्हता. त्या बंगल्याचं नावही वर्षा नव्हतं. मग वर्षा हे नाव या बंगल्याला कसं पडलं आणि या बंगल्याचा नेमका इतिहास काय हे आपण जाणून घेऊया.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी या वर्षा बंगल्याचा संबंध जोडलेला आहे. शेतक-याला पाणी मिळालं की तो चमत्कार करुन दाखवतो, हा सिद्धांत नाईकांनी मांडला आणि तो सिद्धही करुन दाखवला. प्रसिद्ध साहित्यिक मधू मंगेश कर्णीक यांनी वसंतरावांवर ‘दूत पर्जन्याचा’ चरित्र लिहिलं. या चरित्रात वर्षा बंगल्याचा इतिहास सांगितलेला आहे.

(हेही वाचाः चिपीच्या धावपट्टीवर कोल्हा… पुढे घडले असे काही की वाचून थक्क व्हाल)

काय होते बंगल्याचे मूळ नाव?

वसंतरावांनी राज्याच्या कृषीमंत्री पदाचा पदभार सांभाळला. हा पदभार सांभाळताना त्यांच्या वाट्याला डक बिगन नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला. 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डक बिगनमध्ये राहायला गेले. वसंतराव मुळातच टापटीप स्वभावाचे होते, त्यांची बायकोसुद्धा हौशी होती. त्यांना मिळालेला बंगला अगदीच साधा होता, बंगल्याची बांधणी बैठी होती. सगळी दारं उघडी असणा-या या बंगल्यात खाजगीपणा नव्हता. त्यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना तो बंगला बघून क्षणभर तर वाटलं की सगळ्यांनी नाकारलेला बंगला आपल्या वाट्याला आला आहे. शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री बंगला या डक बिगनपेक्षा किती भव्य आणि सुंदर आहे. त्या मानाने हा डक बिगन खूपच साधा आहे.

पाऊस हा वसंतरावांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी पहिल्याच दिवशी या बंगल्याच वर्षा असं नामकरण केलं. वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा, लिंब, सुपारी आदी विविध झाडे लावली. ते माळ्याला म्हणायचे, मी झाडं लावीन ती माझ्यासाठीच आहेत, असं समजू नकोस. पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत.

(हेही वाचाः साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वाटले ५७ लाख रुपये… शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट)

असे झाले मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून नाईक आपल्या वर्षा बंगल्यावर आले. तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते. ते म्हणाले, शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून लौकीक मिळणार असं दिसतंय. तेव्हा नाईक म्हणाले, “होय, बाबासाहेब! छप्पन्न साली आम्ही आपल्या मोठ्या मुलाच्या- अविनाशच्या सहाव्या वाढदिवशी वर्षावर राहायला आलो. तेव्हापासूनचे सारे दिवस सुखाचे गेले.”

वर्षाचं स्थानमहात्म्य

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाईक यांनी वर्षा बंगल्यातील आपलं वास्तव्य हलवलं. परंतु वसंताच्या हृदयातला ‘वर्षा ऋतू’ कायम होता. शेतात राबणाऱ्या कष्टक-यांचाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला. त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलवला आणि आपलं पुसद हे मूळ गाव गाठलं. पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ‘वर्षा’चं स्थानमहात्म्य कायम आहे. किंबहुना ते अधिक ठळक झालं आहे.

(हेही वाचाः बाळासाहेबांमुळेच मोदींचे अस्तित्व आहे नाहीतर… शिवसेना आमदाराचे मोठे विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.