वांद्रे उदंचन केंद्रातही २३० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प; होणार दर महिन्याला २ लाख ४० हजार रुपयांची बचत

सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १ कोटी ५० लाख रूपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च पुढील सहा वर्षात वसूल होईल.

69
वांद्रे उदंचन केंद्रातही २३० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प; होणार दर महिन्याला २ लाख ४० हजार रुपयांची बचत
विशेष प्रतिनिधी, मुंबई

आशिया खंडातील सांडपाण्याचे सर्वात मोठे उदंचन केंद्र असा नावलौकिक असलेल्‍या वांद्रे विभागातील माहीम कॉजवे येथील महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वांद्रे उदंचन केंद्राच्‍या छतावर २३० किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे. त्यामुळे दरमहा निर्माण होणाऱ्या ३० हजार युनिट विद्युत ऊर्जेचा वापर उदंचन केंद्रासाठीच करण्यात येत आहे. या सौर विद्युत ऊर्जेमुळे दर महिन्याला सुमारे २ लाख ४० हजार रुपयांच्‍या वीज खर्चाची बचत होत आहे.

महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्‍प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्‍त (अभियांत्रिकी), उपायुक्‍त (पर्यावरण) यांच्‍या मार्गदर्शनाखाली, मलनि:सारण प्रचालने खात्यामार्फत विविध पर्यावरण पूरक बाबींचे नियोजन व व्यवस्थापन नियमितपणे करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून वांद्रे आंतरगामी उदंचन केंद्राच्‍या छतावर सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करणारी यंत्रणा (रूफ टॉप सोलर सिस्टिम) अलीकडे कार्यान्वित करण्यात आली आहे. सौर ऊर्जा पॅनलद्वारे प्राप्त होणारी विद्युत ऊर्जा ही ‘झिरो एक्सपोर्ट मॉडेल’ अंतर्गत उदंचन केंद्रामध्येच वापरली जात आहे, अशी माहिती प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रचालने) सतीश चव्‍हाण यांनी दिली आहे.

(हेही वाचा – महापालिकेच्या ‘या’ विभाग कार्यालयाने वाचवले ५ हजार विजेचे युनिट; महिन्याला वाचतात सुमारे ४२ हजार रुपये)

वांद्रे (Mumbai Municipal Corporation) आंतरगामी उदंचन केंद्र सन २००३ मध्ये कार्यान्वित झाले. आंतरगामी उदंचन केंद्रातर्फे शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे आदी भागातील मलप्रवाहाचा निचरा केला जातो. उदंचन केंद्रात एकूण ८ मुख्य उदंचक संच आहेत. प्रत्येक उदंचक संचाची क्षमता प्रतिदिन ३११ दशलक्ष लीटर्स आहे. त्‍यांना ६.६ केव्ही, १ हजार ५०० किलो वॅट क्षमतेच्या विद्युत मोटर्स जोडण्यात आल्या असल्याची माहिती चव्‍हाण यांनी दिली.

वीज वाचवण्यासह पर्यावरण पूरकता जपणे आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर करणे या धोरणांतर्गत उदंचन केंद्राच्‍या छतावर २३० किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा अलीकडे कार्यान्वित करण्‍यात आली आहे. याद्वारे दरमहा साधारणपणे ३० हजार युनिट विजेची निर्मिती होत आहे‌. मार्च २०२३ मध्ये या सौर ऊर्जा प्रकल्पातून ३१ हजार २०० युनिट तर एप्रिल २०२३ मध्ये ३१ हजार ४८२ युनिट विजेची निर्मिती झाली. त्‍यामुळे दरमहा किमान २ लाख ४० हजार रूपयांच्या वीज खर्चाची बचत होत आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आयुर्मान हे सुमारे २५ वर्षे इतके आहे. ही बाब लक्षात घेतल्यास आजच्या विद्युत दरानुसार पुढील पंचवीस वर्षात साधारणपणे ७ कोटी २० लाख रुपयांची विद्युत खर्चातील बचत साध्य होणार आहे. भविष्यात वीज दरांमधील संभाव्य वाढीचा अंदाज बांधल्यास विद्युत खर्चात होणारी बचत ही निश्चितच ७ कोटी २० लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, असेही चव्हाण यांनी नमूद केले. (Mumbai Municipal Corporation)

हेही पहा – 

या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १ कोटी ५० लाख रूपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च पुढील सहा वर्षात वसूल होईल. समवेत, हा प्रकल्प पुढील २५ वर्षात ७ हजार टनपेक्षा अधिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन रोखण्यास मदत करेल. या प्रकल्पाचा पर्यावरणाचा परिणाम ११ हजार वृक्ष लागवडीएवढा आहे, अशी माहिती मलनि:सारण विभागाचे उपप्रमुख अभियंता (पश्चिम उपनगरे) शपंढरीनाथ गीते यांनी दिली. (Mumbai Municipal Corporation)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.