स्वातंत्र्यवीर सावरकरांवर श्रद्धा ठेवणारे भागोजीशेट कीर

140

दानशूर समाजसेवक भागोजीशेट कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतिशय जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. रत्नागिरी पर्व आणि त्यानंतर वीर सावरकरांच्या जीवनात भागोजीशेट कीर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी सुरू केलेल्या चळवळीसाठी भागोजीशेट कीर यांनी कधीही आर्थिक मदत कमी पडू दिली नाही. पतित पावन मंदिराच्या उभारणीच्या दरम्यान संपर्कात आलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजीशेट कीर यांचे नाते शेवटपर्यंत कायम होते.

जाती-पातीत विभागलेल्या समाजातील सर्वांना एकत्र आणण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी पर्वातील एक भाग होता. जो संपूर्ण भारताने स्वीकारला. यामध्ये मुख्य कार्य म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन आणि त्यासाठी अस्पृश्यांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश देऊन सर्वांना एका रांगेत बसून जेवायला देणे हे होते. या कामासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भागोजीशेट कीर यांच्या समोर पतित पावन मंदिर बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. अवघ्या दोन वर्षांत भागोजीशेट कीर यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराच्या माध्यमातून दोन मोठी कामे झाली, त्यापैकी एक म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन आणि दुसरे म्हणजे हिंदू महासभेच्या कामाला गती देणे.

सरस्वती आणि लक्ष्मीचा मेळ

स्वातंत्र्यवीर सावरकरांना सरस्वतीच्या रुपात चित्रित करण्यात आले आहे. अर्थात सरस्वतीकडे धनाची कमतरता असते. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीच्या वास्तव्यात समाजोन्नतीचे कार्य सुरू केले होते. एकीकडे ब्रिटिश सरकारने वीर सावरकरांवर घातलेले अमर्याद निर्बंध, बॅरिस्ट्री न करण्याचा आदेश आणि दुसरीकडे इतर कैद्यांच्या तुलनेने कमी मिळणारा निर्वाह भत्ता यामुळे रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जगणे कठीण झाले होते. अशा काळात भागोजीशेट कीर लक्ष्मीच्या रुपात धावून आले आणि त्यांनी राष्ट्रहितासाठी समर्पित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना सामाजिक उन्नतीसाठी निधी दिला.

ज्या काळात सोन्याची किंमत १८ रुपये तोळा होती, त्या काळात भागोजीशेट कीर यांनी एक लाख रुपये खर्च करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांगण्यावरुन पतित पावन मंदिर बांधले. यानंतर मंदिरातील कार्यक्रमांचा सर्व खर्च ते करत राहिले. शिवाय हिंदू महासभेलाही देणगी दिली. सप्टेंबर १९३० ते १० जून १९३७ या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन मंदिरात एकूण सात अखिल हिंदू गणेशोत्सवाचे आयोजन केले होते, ज्याचा संपूर्ण खर्च भागोजीशेट कीर यांनी केला होता.

मुंबईत नाते झाले अधिक घट्ट

स्थानबद्धता संपल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर मुंबईत आले. ते दादर येथे राहू लागले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजीशेट कीर यांचे नाते मुंबईत अधिक घट्ट झाले. भागोजीशेट कीर यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर रोज त्यांच्या निवासस्थानातून भागोजीशेट कीर यांच्या माहीम येथील भागेश्वर भुवन येथे जात आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून परत येत. यावरून या दोघांमधील नात्याचा अंदाज लावता येतो. भागोजीशेट कीर वीर सावरकर यांना विनायक म्हणजेच गणपती म्हणायचे.

दादर स्मशानभूमी सर्व हिंदूंसाठी खुली केली

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा विस्तीर्ण भूखंड एकेकाळी भागोजीशेट कीर यांच्या वसाहतींपैकी एक होता. तिथे भागोजीशेट कीर यांनी हिंदू स्मशानभूमी बांधली. जी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्व हिंदूंसाठी खुली करण्याचा आग्रह केला होता, जो भागोजीशेट कीर यांनी मान्य केला आणि तो अंमलात आणला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.