‘बेस्ट’मधील नव‘चैतन्य’ कोणासाठी?

108

बेस्ट उपक्रम सध्या तोट्यात असून बेस्टच्या वातानुकूलित बस गाड्यांची संख्या वाढवून मुंबईकरांसमोर वेगळे चित्र निर्माण केले जात आहे. एका बाजूला बेस्टने आर्थिक काटकसर आणि महसूल वाढवण्याचं प्रयत्न करणे अपेक्षित असताना उपक्रमाने महसूल वाढवणाऱ्या उपहारगृहेच तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या तब्बल पंधरा उपहारगृहाना ३० एप्रिल पर्यंत बंद करून त्या जाग्या प्रशासनाच्या ताब्यात देण्याचं आदेश उपक्रमाने काढले आहेत. त्यामुळे या बेस्ट मध्ये कामगारांसह इतरांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद होणार असून हे उपहारगृह चालवण्यास दिल्याने यातून मिळणाऱ्या उत्पनातून बेस्टच्या महसुलात भर पडत होती. परंतु ही उपहारगृहे बंद करून आपल्या मर्जीतल्या एका हॉटेल व्यवसायिकाला ही उपहारगृहे चालवण्यास देण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत घातला आहे. त्यामुळे कोणते नव ‘चैतन्य’ निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न बेस्ट कडून सुरू आहे अशी चर्चा बेस्टमध्ये सुरू आहे.

( हेही वाचा : कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेने रद्द केल्या प्रवासी गाड्या! )

नोटीस पाठवून ३० एप्रिलपर्यंत जागा खाली करण्याचे आदेश

बेस्ट उपक्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात दरात जेवण व नाश्ता मिळावा यासाठी आगराच्या काही जागा उपहारगृह चालवण्यासाठी दिल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून या उपहारगृहांची जागा नव्याने निविदा मागवून त्यातील पात्र कंपनीला दिल्या जातात. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपहारगृहांची मुदत संपल्यावर त्याठिकाणी नव्याने निविदा राबवून त्यातील पात्र कंपनीची निवड झाल्यानंतर जुन्या कंपनीला आपला हक्क सोडावा लागतो. परंतु कोणत्याही प्रकारची निविदा न राबवता बेस्टने तब्बल १५ उपहार गृहांच्या चालकांना नोटीस पाठवून ३० एप्रिल पर्यंत जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तडकाफडकी जागा खाली करण्याच्या या नोटीस मुळे उपहारगृहांच्या चालकांमध्ये व तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कंत्राटदारामध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न

मागील महिन्यात बेस्टच्या कुलाबा आणि वडाळा या दोन आगारांमध्ये अक्षया चैतन्य याएका बाहेरील संस्थेला अन्न शिजवून विक्री करण्यास मुभा दिली होती. हे हॉटेल व्यवसायिक अन्न शिजवून आणून सकाळी साडे आठ ते साडे नऊ या कालावधीत नाश्ता आणि दुपारी साडे बारा ते अडीच या वेळेत जेवण वितरित करायचे. नाश्ता बारा रुपये आणि जेवण ३५ रुपये या दरात उपलब्ध करून दिले जायचे. या कंत्राटदाराला बेस्टच्या चालक आणि वाहकाला मदत करण्याचे आवाहन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले होते. परंतु १५ दिवस या जेवण व नाश्ता यांचा स्टॉल लावणाऱ्या या कंपनीने पुढे बंद केला आणि काही दिवसांतच प्रशासनाने १५ उपहार गृहांच्या चालकांना नोटीस बजावून जागा खाली करण्याचे निर्देश दिल्याने १५ दिवस जेवण व नाश्ता यांची विक्री करणाऱ्या कंत्राटदारामध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न तर बेस्ट प्रशासन करत नाही ना असा प्रश्न बेस्ट कामगारांना पडला आहे.

येथील कामगारांच्या म्हणण्यानुसार, १५ दिवस जेवण व नाश्ता विक्री करणाऱ्या संस्थेचा वशिला सरकारमध्ये मोठा असून त्यांच्या आशीर्वादामुळे प्रशासनाने त्यांना बेस्टच्या आगारातील जागा उपलब्ध करून दिली होती. ही संस्था आता सर्व ठिकाणी उपहारगृह चालवणार असून कोणत्याही प्रकारची निविदा न मागवता या संस्थेला ही उपहारगृहे चालवण्यास दिली जाणार असल्याची चर्चा बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.