Israel-Palestine conflict : हमास : जिहादी आक्रमणाचा क्रूर व विक्राळ चेहरा

‘हमास’ ही संघटना गेली पन्नास पंचावन्न वर्षे अस्तित्वात असून ती याच पद्धतीच्या कारवाया आजवर करत आलेली आहे.

106
Israel-Palestine conflict : हमास : जिहादी आक्रमणाचा क्रूर व विक्राळ चेहरा
Israel-Palestine conflict : हमास : जिहादी आक्रमणाचा क्रूर व विक्राळ चेहरा
  • माधव भांडारी

काही दिवसांपूर्वी ‘हमास’ या दहशतवादी इस्लामी संघटनेने इस्त्रायलवर (Israel-Palestine conflict ) केलेल्या पाशवी हल्ल्यामुळे जग हादरून गेले आहे. एकतर हा हल्ला सर्वस्वी अनपेक्षित होता, कोणतेही कारण नसताना हा हल्ला केला गेला होता. दुसरे म्हणजे ह्या हल्ल्याची तीव्रता विलक्षण होती. हजारो निरपराध इस्त्रायली नागरिक व सैनिकांची कमालीच्या क्रूरपणे कत्तल केली गेली. त्याचसोबत शेकडो नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस म्हणून पळवून नेले गेले. आंतरराष्ट्रीय कायदे, संकेत, नैतिकता, माणुसकी यापैकी कशाचीही पत्रास न बाळगता हा हल्ला केला गेला आणि त्याचे तेवढेच निर्लज्ज समर्थन केले जात आहे. हा पाशवी हल्ला करणारी ‘हमास’ ही इस्लामी दहशतवादी संघटना त्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘हमास’ ही संघटना गेली पन्नास पंचावन्न वर्षे अस्तित्वात असून ती याच पद्धतीच्या कारवाया आजवर करत आलेली आहे. १९६७ साली झालेल्या ऐतिहासिक ‘सहा दिवसांच्या युद्धा’त मुस्लीम आक्रमकांना इस्त्रायलकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या संघटनेने त्या पराभवानंतर आपले धोरण मोठ्या प्रमाणावर बदलले. त्यांनी १९७० पासून गाझा पट्टीत ‘स्वयंसेवी संस्थां’च्या नावाखाली अनेक उपक्रम सुरू केले. ‘धार्मिक शिक्षण’ हे त्यात प्रमुख होते. त्या ‘शिक्षणा’तून वेगवेगळ्या कडव्या, लढाऊ संघटना जन्माला येत गेल्या. ‘हमास’ची पाळेमुळे त्यात आहेत. असे अनेक वेगवेगळे गट व लहान लहान संघटनांनी एकत्र येऊन १९८७ मध्ये Harakat al-Muqawamahal-Islamiyyah (HAMAS) म्हणजे Islamic Resistance Movement ही संघटना स्थापन केली.

शेख अहमद यासीन हा या संघटनेचा संस्थापक होता. हा शेख अहमद यासीन कडवा व धर्मांध मुसलमान होता. त्याला कोणत्याही प्रकारचा Secular विचार मान्य नव्हता. विशेष म्हणजे Secularism नाकारणाऱ्या या संघटनेला जगभरातील डाव्यांनी तेव्हापासून आजवर भक्कम पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे थोडीफार धार्मिक व राजकीय लवचिकता बाळगू पाहणारा यासर अराफात व त्याच्या पी.एल.ओ. ला शेख अहमद यासीन व त्याच्या नव्या संघटनेचा कट्टर विरोध होता. त्यांच्या आक्रमक आणि कडव्या, धर्मांध राजकारणापुढे यासर अराफात पूर्णपणे निष्प्रभ झाला आणि २००४ साली त्याचा मृत्यू झाल्यानंतर तर त्यांनी पी.एल.ओ. चे अस्तित्वच संपवले. आपले ‘जिहादी लढाऊ हत्यार’ या पद्धतीने Muslim brotherhood ने ‘हमास’ला जोपासले आणि ते काम ‘हमास’ आजवर ईमानेइतबारे करत आली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना मोठे करण्यात अरब देश आघाडीवर होते; पण त्यांनी उभा केलेला हा भस्मासूर आता त्यांचाच बळी घ्यायला निघाला आहे.

(हेही वाचा – India-Canada Relations : भारत-कॅनडा वाद, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर याचं महत्त्वाचं वक्तव्य)

जगाच्या नकाशावरून इस्त्रायलचे अस्तित्व पुसून टाकणे हे या संघटनेचे जाहीर केलेले उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न म्हणजे हिंसक हल्ले ही संघटना नियमितपणे करत असते. इस्त्रायली सैनिकांचे व नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवणे किंवा क्रूर पद्धतीने छळ करून मारून टाकणे, आकस्मिक हल्ले करून सामूहिक कत्तली करणे, स्फोटकांनी भरलेल्या गाड्या वस्त्यांमध्ये घुसवून मृत्यूचे तांडव घडवून आणणे, आत्मघातकी व्यक्तींना वापरून स्फोट घडवून आणणे ते थेट लष्करी हल्ले करणे अशा सर्व प्रकारांचा वापर ही संघटना सतत करत असते. या हिंसक कारवायांखेरीज त्यांनी आजवर इस्त्रायल विरुद्ध तीन युद्धे केली असून आत्ताचे चौथे आक्रमण आहे. जगभरातून स्थलांतर करून पॅलेस्टाईनमध्ये येत राहणारे, जिहादच्या नशेचा उन्माद चढलेले तरुण ही त्यांची मनुष्यबळाची रसद आहे. इराण, तुर्की आणि चीन या देशांचा त्यांना सक्रीय पाठिंबा आहे. त्यांना लागणारी आर्थिक व शस्त्रास्त्रांची ताकद बहुतांशी चीन व इराण पुरवत असतात. इस्त्राएलबरोबरच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशीदेखील ‘हमास’ शत्रुत्व बाळगून आहे. ‘हमास’ ही मुख्यत: सुन्नी मुसलमानांची संघटना असली, तरी शियापंथीय इराण आपल्या इस्त्रायल विरोधी राजकारणासाठी त्यांना आजवर पोसत आला आहे.

‘हमास’ने आत्ता इस्त्रायलवर केलेल्या आक्रमणामागे इराण व चीनची प्रेरणा आहे; कारण इस्त्रायल व सौदी अरब यांच्यात एक करार होऊ घातला होता. त्या कराराचा एक भाग म्हणून सौदी अरेबियाला अमेरिकेचे संरक्षण मिळणार होते. तसे झाले असते तर इराण व चीन या दोघांचेही नुकसान झाले असते. म्हणून तो करार हाणून पाडण्याच्या प्राथमिक उद्देशाने हा हल्ला केला गेला असावा, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे. हा हल्ला झाल्यानंतर सौदी अरेबियाने आपला करार करण्याचा मनसुबा सध्या तरी पुढे ढकलला आहे. हे पाहता, अभ्यासकांचे मत बरोबर असल्याचे दिसून येते.

‘हमास’ची कार्यपद्धती आणि आत्ताचा हल्ला यातून आपण शिकण्यासारखे खूप आहे. एकतर ‘स्वयंसेवी संस्था’ आणि त्यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्था – मदरसे ही जगभरातील इस्लामी दहशतवाद्यांची समान कार्यपद्धती आहे. हे मदरसे म्हणजे हिंस्त्र दहशतवादी तयार करण्याचे कारखाने आहेत. २६/११ चा कुप्रसिद्ध मुंबई हल्ला घडवून आणणारा हाफिज सईद हाच उद्योग करतो. या ‘स्वयंसेवी संस्थां’च्या नावावर देश-विदेशातून अमाप पैसा जमा केला जातो व त्या पैशांचा वापर ‘जिहादी दहशतवादाच्या निर्याती’साठी केला जातो. ‘जिहादी दहशतवाद’ किती क्रूर आणि अक्राळविक्राळ आहे हे ‘हमास’ने इस्त्रायलमध्ये दाखवून दिले आहे. यानंतर ह्या क्रूर दहशतवादाचे पुढचे लक्ष्य हिंदू व भारत असणार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.