ऐतिहासिक निर्णय: …म्हणून ‘या’ नव-याने पत्नीच्या घरी नांदायला जावे- न्यायालय

115

अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अहमदनगरमधील एका नव-याला न्यायालयाने बायकोकडे नांदायला पाठवण्याचा निर्णय दिला आहे. अहमदनगरमधील पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आहेत. या जोडप्यातील एक जण जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात नोकरीला तर दुसरा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरीला आहे. या दोघांचा ऑगस्ट 2014 मध्ये विवाह झाला होता.

नेमके प्रकरण काय?

2014 मध्ये दोघांचा विवाह झाला होता. विवाहाच्या दोन वर्षांनंतर या दोघांना एक मुल झाले. मात्र, दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला असल्याने संसारात ओढाताण होत होती. त्यात मुलाचा सांभाळ करुन नोकरी सांभाळताना दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. या वादातून पत्नीने नोकरीच्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच नव-याची बदली होऊ शकते मात्र आपली बदली होऊ शकत नसल्याने नव-याने आपल्याकडे येऊन राहण्याची मागणी बायकोने केली होती. तसेच, सासरकडची मंडळी छळ करत असल्याचा आरोपही महिलेने केला. यावरुन दोघांमध्ये आणखी वाद झाले. जुलै 2018 मध्ये पतीने पत्नीला संमतीने घटस्फोटासाठी नोटीस पाठवून दिली. घटस्फोटाची नोटीस आल्याने सुरुवातीला पत्नीला धक्का बसला. मात्र, आता संसारासाठी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्धार पत्नीने केला आणि आपल्या वकीलामार्फत न्यायालयात धाव घेतली. महिलेच्यावतीने वकील भगवान कुंभकर्ण आणि शिवाजी सांगळे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

( हेही वाचा: आदित्य ठाकरेंच्या वरळीत ठाकरे गटाला धक्का; युवासेनेचा पदाधिकारी शिंदे गटात सामील )

नव-याने पत्नीकडे नांदायला जावे- न्यायालय

सासरच्याकडून आपला छळ होत असल्याचे पत्नीने न्यायालयात सांगितले होते. तसेच पतीने आपल्यासोबत नोकरीच्या ठिकाणी राहून संसार करण्याची मागणी पत्नीने केली होती. वास्तविक पतीची बदली होऊ शकत असतानादेखील ते बदली करुन घेत नसल्याचे पत्नीचे म्हणणे होते. तसेच पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज नामंजूर करण्याची मागणीदेखील पत्नीने न्यायालयासमोर केली होती. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेत दोन महिन्यांच्या आत नव-याने बायकोकडे राहण्यासाठी जाण्याचा आदेश दिला. नव-याने बायकोकडे राहण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.