मध्य रेल्वेने फुकट्यांकडून ७ महिन्यात तब्बल १९३.६२ कोटी केले वसूल

128

विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एप्रिल-ऑक्टोबर २०२२ दरम्यान, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २९.०३ लाख प्रकरणे आढळून आली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १६.१६ लाख प्रकरणे होती, ज्यामध्ये ७९.४६% ची वाढ दिसून येत आहे. अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेला महसूल एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ₹ १९३.६२ कोटी नोंदवला गेला, तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ₹ ९३.२९ कोटींची नोंद झाली होती, त्यात १०७.५४% ची वाढ झाली आहे.

(हेही वाचा – Google Street View Shut Down: रस्ते सांगणारे ‘हे’ App गुगल कायमचे बंद करणार)

ऑक्‍टोबर २०२२ या महिन्‍यात, विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या व बुक न केलेल्या सामानासह ४.४४ लाख प्रकरणांद्वारे मध्य रेल्वेने ₹ ३०.३५ कोटींचा महसूल नोंदविला आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले. २०२२-२३ या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी कर्मचार्‍यांपैकी चार जणांनी एक कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा करून उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.

१) डी. कुमार, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी १५.०५३ प्रकरणांमधून रु. १.४३ कोटी,
२) एस. बी. गलांडे, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी १४,८३७ प्रकरणांमधून रु. १३.४ कोटी,
३) एच. ए. वाघ, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी ११,६३४ प्रकरणांमधून रु. १.०४ कोटी,
४) सुनील डी. नैनानी, टीटीआय, मुंबई विभाग यांनी १२,१३७ प्रकरणांमधून रु. १.०३ कोटी.

याशिवाय, भुसावळ विभागातील २ आणि पुणे विभागातील एक असे तीन तिकीट तपासणी कर्मचारी आहेत ज्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात ९० लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

  1. के.के. पटेल, मुख्य तिकीट परीक्षक, भुसावळ विभाग यांनी ११,३३६ प्रकरणांमधून रु. ९९.२३ लाख.
  2. विनय ओझा, मुख्य तिकीट निरीक्षक, भुसावळ विभाग यांनी ११,८१८ प्रकरणांमधून रु.९३.५४ लाख,
  3. एस.एस. क्षीरसागर, मुख्य तिकीट निरीक्षक, पुणे विभाग यांनी ९,६२३ प्रकरणांमधून रु.९१.४४ लाख.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.